राजकारण

‘एमपीएससीचे अध्यक्षांसह सर्व सदस्य बरखास्त करा’; आमदार संजय गायकवाड आक्रमक

बुलढाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून सुरू असलेल्या वादात आता सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीच आक्रमक भूमिका घेतली आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यासह आयोगातील सर्व सदस्यांना बरखास्त करावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. त्यांनी रविवारी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

गायकवाड यांनी आयोगातील गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. काही सदस्यांच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करावी, त्यांच्या संपत्तीची तपासणी करावी आणि आवश्यक असल्यास दूरध्वनी संपर्काचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित सदस्यांच्या प्रभावामुळे उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीबाबतही गैरप्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार

आपण सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवणे आवश्यक असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. एमपीएससीच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य असून त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, एमपीएससीच्या कारभारावरून विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने यापूर्वी आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदलीही करण्यात आली आहे. आगामी परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने घेण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

गायकवाड यांच्या मागणीमुळे एमपीएससीच्या कारभारावरून सुरू असलेल्या वादाला आता सत्ताधारी पक्षातूनही नवी धार मिळाली आहे. आयोगातील कथित गैरप्रकारांची चौकशी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार पुढे कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page