गुन्हेगारी

पुण्यात भरदिवसा व्यापार्‍याकडील रोकड लुटणार्‍या २ मुख्य आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून अटक

पुणे : पुण्यातील रास्ता पेठेत भरदिवसा व्यापार्‍यास कोयत्याचा धाक दाखवुन त्यांच्याकडील ४७ लाख रूपये लुटणार्‍या २ मुख्य आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख रूपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे. किरण अशोक पवार (रा. अप्पर, बिबवेवाड) आणि आकाश कपील गोरड (रा. अप्पर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. भरदिवसा व्यापार्‍यास लुटणार्‍यांचा युध्दपातळीवर शोध घेवून त्यांना अटक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिले होते. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार आणि युनिट-१ चे पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद हे समर्थ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. त्यांनी पुणे शहरातील बाणेर, हिंजवडी, गहुंजे आणि परिसरातील २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान दि. २८ मार्च रोजी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे आणि पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत सदरील गुन्हा हा किरण पवार आणि त्याचा साथीदार आकाश गोरड यांनी केल्याची माहिती मिळाली. सध्या किरण पवार हा वाघोली परिसरात लपुन बसला असल्याचे समजले तर आकाश गोरड हा पवना डॅम कोथरणेगाव येथे पळून गेला असून त्याच्याकडे लुटलेली रक्कम असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने दोघांबाबत अधिक माहिती घेतली. त्यानंतर आकाश गोरड याला पवणा डॅम कोथुरणे गाव परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख रूपये जप्त करण्यात आले तर पोलिस पथकाने किरण पवारला वाघोली येथील वाघेश्वर मंदिर परिसरातून ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून ४ लाख रूपये जप्त केले. पोलिसांनी दोघांकडून एकुण 5 लाख रूपये जप्त केले आणि त्यांना अटक केली. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे आणि बेकायदेशीररित्या हत्यार बागळण्याचे गुन्हे दाखल आहेत. सदरची ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे आणि सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे, शुभम देसाई, राहुल मखरे, अभिनव लडकत, निलेश साबळे, महेश बामगुडे, आय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page