गुन्हेगारीपुणे शहरमराठवाडामहाराष्ट्रसामाजिक

नांदेडहून पुण्यात पळवून आणलेल्या युवतीला दिले गर्भपाताचे औषध 

रक्तस्त्रावामुळे पीडिता ससून मध्ये; सामाजिक कार्यकर्त्या महिलेमुळे दिलासा

पुणे : जिवाचे बरे वाईट करून घेण्याची धमकी देऊन २१ वर्षीय तरुणीशी जबरदस्तीने शारिरीक संबंध करत ती गर्भवती झाल्यानंतर तिला गर्भपाताचे औषध देऊन पसार झालेल्या तरुणास चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली. आपल्या भूमिकांनी कायम चर्चेत असणाऱ्या व महिला अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

आकाश कुंडलीक चौधामाले (वय २६ वर्षे, रा. प‌द्मभूषण वसंतदादा प्राथमिक शाळा, सोमेश्वरवाडी, पाषाण) असे त्याचे नाव आहे. २१ वर्षीय तरुणी रुग्णांची देखभाल करण्याचे काम करते‌. आकाश आणि तिची ओळख सोशल मीडियावर झाली होती. ती मूळची नांदेड येथील असून त्याने संपर्क प्रस्थापित करुन लग्नाचे आमिष दाखवून तिला नांदेड मधून पळवून आणले. ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली.

आकाश याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी लाॅजवर नेले. जिवाचे बरे वाईट करून घेण्याची धमकी देऊन बलात्कार केला.

त्यामुळे युवती गरोदर राहिली. आकाश याच्या सोमेश्वरवाडी, पाषाण येथील घरी तिला ठेवले. तिची लग्न करण्याची मागणी त्याने धुडकावून लावली. नंतर ती गर्भवती असल्याचे दिसून आल्याने आकाश याने तिला  गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. आपल्या घरी काही समजायला नको या भितीने तिने गोळ्या घेतल्या. नंतर तिला मैत्रीणीकडे पाठवून घराला कुलूप लावून आकाश पसार झाला.

नुकतीच ती हडपसर येथे मैत्रीणीच्या घरी असताना रक्तस्त्राव झाल्याने ससून हॉस्पिटल मध्ये तिला नेण्यात आले. तिचा गर्भपात झाल्याचे दिसून आले. तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी चतुःश्रृंगी पोलिसांना ही बाब समजली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता कोणकोणत्या ठिकाणी तिला आकाश याने नेले होते हे तिला आठवत नव्हते. तसेच आकाश याला दमदाटी करून आपल्या सोबत राहण्याविषयी पोलिसांनी सांगावे अशी तिची इच्छा होती. असे पोलिसांनी सांगितले.

https://www.facebook.com/share/p/1CcxA1VXL9/

महिला सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल या ससून रुग्णालयात अन्य एका प्रकरणात आलेल्या असताना त्यांना या पीडितेविषयी माहिती समजली. त्यांनी तिला दिलासा देत चतुःश्रृंगी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी आकाश चौधामाले याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच तातडीने शोध सुरू केला. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी ननावरे, पोलीस उपनिरीक्षक मनिषा जाधव, तपास अधिकारी उपनिरीक्षक मिरा चव्हाण यांनी ससून रुग्णालयात पोहचून योग्य कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page