महाराष्ट्रसामाजिक

“पोरगी तर गेली, आता ‘तडजोडी’च्या तुकड्यांवर गप्प बसणार का? ग्रामीण भागातील संशयास्पद महिला मृत्यू आणि ‘बाहेरच्या बाहेर’ मिटवणाऱ्या पंचायतींचा पंचनामा!”

पैसा, सोनं आणि जमिनीच्या लोभापायी नराधम सुटतात मोकाट; नातेवाईक गप्प राहिले तरी पोलिसांनी स्वतः वादी होऊन गुन्हा दाखल करण्याची आता वेळ आली आहे!

विशेष प्रतिनिधी, निलंगा (लातूर) : ग्रामीण भागात जेव्हा एखाद्या विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू होतो, तेव्हा कायदा आणि न्यायव्यवस्थेची थट्टा उडवणारा एक ठरलेला ‘पॅटर्न’ पाहायला मिळतो. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे घडलेली सौ. शकुंतला मोरे यांच्या मृत्यूची ताजी घटना याच क्रूर पॅटर्नचे जिवंत उदाहरण आहे. ४ वर्षांच्या निष्पाप बालिकेची आई जाते काय आणि अवघ्या काही तासांत “रात गई, बात गई” करत प्रकरण दाबले जाते काय? हा प्रकार म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेच्या चिंधड्या उडवणारा आहे.

पैसा, सोनं आणि जमीन: गुन्हेगारांचे हुकमी हत्यार!

सहसा अशा घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्याची पायरी चढू न देण्यासाठी चक्रं फिरवली जातात. “मुलगी तर गेली, आता भांडून काय फायदा?” असा तथाकथित समजूतदारपणाचा सल्ला द्यायला गावातले चार पांढरपेशी पुढारी गोळा होतात. त्यानंतर सुरू होतो ‘तडजोडीचा’ घाणेरडा खेळ!

मृत मातेच्या मुलांच्या नावे मुदत ठेव (FD) करणे, शेतजमीन नावावर करून देणे, सोन्या-नाण्याचे आमिष दाखवणे, असे नाना प्रकारचे प्रयोग करून अगतिक, गरीब आणि अशिक्षित आई-वडिलांचे तोंड बंद केले जाते. चार लोक जमा होतात, आमिषं दाखवतात आणि आपापल्या घरी निघून जातात. पण मागे सुटतात ते कायद्याच्या कचाट्यातून वाचलेले ‘नराधम’, ज्यांना या तडजोडींमुळे पुन्हा नवा गुन्हा करण्याचे बळ मिळते.

नातं संपलं, पण गुन्हेगारांना जेलची हवा कधी मिळणार?

“आमची मुलगी तर हातातून गेली, पण तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांना कायद्याने जेल दाखवायलाच हवी,” हा विचार ग्रामीण भागातील पालकांच्या मनात कधी रुजणार? पैशाच्या किंवा जमिनीच्या लोभापायी पोटच्या लेकीच्या रक्ताचा सौदा करणे कितपत योग्य आहे? आज आपण पैशासाठी गप्प बसलो, तर उद्या शेजारच्या किंवा स्वतःच्याच दुसऱ्या लेकीचा बळी घेण्यास हे गुन्हेगार धजावणार नाहीत का? हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

पोलीसांनी स्वतः ‘फिर्यादी’ होण्याची गरज!

अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये जर पीडित महिलेचे नातेवाईक भीतीपोटी, अज्ञानापोटी किंवा दबावामुळे तक्रार देण्यास पुढे येत नसतील, तर शासकीय यंत्रणेने म्हणजेच पोलिसांनी स्वतःहून (Sua Moto) हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

“नातेवाईकांची तक्रार नसेल, तर पोलिसांनी स्वतः वादी बनून गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कायदा काय असतो हे आरोपींना दाखवून दिले पाहिजे.”

जोपर्यंत पोलीस स्वतःहून अशा तडजोडी मोडून काढत नाहीत आणि गुन्हेगारांना बेड्या ठोकत नाहीत, तोपर्यंत रोज अशाच घटना घडत राहतील. आमिषांचे तुकडे फेकून आरोपी समाजात ताठ मानेने वावरत राहतील आणि निष्पाप महिलांचे बळी जातच राहतील.

निलंग्यातील शकुंतला मोरे यांचे प्रकरण केवळ एक घटना नसून ग्रामीण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. आता तरी समाजाने जागे व्हावे आणि ‘तडजोड’ नाकारून ‘न्याय’ मागण्याची हिंमत दाखवावी, हीच काळाची गरज आहे.

मुलींनो आणि माता-भगिनींनो, वेळीच जाग्या व्हा; अत्याचार सहन करू नका!

सासरच्या मंडळींकडून, मग तो पती असो, सासू असो की सासरा… जर कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक त्रास होत असेल, तर तो मुकाट्याने सहन करण्याची चूक अजिबात करू नका. तुमच्यावर होणारा अन्याय वेळीच आपल्या माहेरच्या लोकांना सांगा, त्यांना विश्वासात घ्या आणि संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन कायदेशीर तक्रार दाखल करा. ‘आज सुधरेल, उद्या सुधरेल’ या आशेवर कोणताही जुलूम किंवा अन्याय सहन करत राहू नका; कारण आज तुम्ही सहन केलेली छोटीशी गोष्ट उद्या सासरच्या या ‘राक्षसी वृत्तीला’ आणखी बळ देईल आणि एक दिवस तुमचा निष्पाप बळी घेईल. तुमचा जीव मौल्यवान आहे, अगतिक होऊन टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा कायद्याची मदत घ्या आणि या अत्याचाराविरुद्ध लढायला शिका!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page