हडपसरच्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये घातपात करण्याचा प्रयत्न करणारा ब्राह्मण्यवादी संघटनेशी संबंधीत ?
माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांचा प्रश्न

पुणे: हडपसरच्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये घातपात करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी शिवाजी रामा राठोड (वय २९, रा. मांजरी, पुणे, मूळगांव कवठे, सोलापूर) कोणत्या अतिरेकी संघटनेशी संबंधीत आहे, त्याने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले हाते, त्याचे साथीदार कोण कोण आहेत वगैरे माहिती मिळवावी,अशी मागणी माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांनी केली आहे.
हडपसर भागातील उषा किरण रुग्णालयातील स्वच्छतागृहात १३ मे रोजी सायं. ७.३० च्या दरम्यान टायमर बॉम्ब सदृश वस्तू मिळून आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहिती नुसार राठोड दहा मे रोजी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. तेथे उपचाराचा खर्च जास्त सांगितल्याने त्याने रुग्णालयाकडून आठ लाखाची खंडणी उकळण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने सोशल मिडियाच्या मदतीने डिजिटल घड्याळ, चार पाईप, चिकटपट्टी आणि लाल-काळ्या वायरचा वापर करून अवघ्या चारशे रुपयात बनावट बॉम्ब तयार केला. त्यात स्फोटक पदार्थ नव्हते, हे दहशतवादी कृत्य नाही.
मुश्रीफ यांनी म्हटले आहे की उषाकिरण रुग्णालयात सापडलेली वस्तू ही केवळ बॉम्ब सदृश नसून तो खरोखरचाच बॉम्ब (आयईडी) असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्या आयईडी मध्ये जिलेटिन, टायमर, डिटोनेटर, वायर, अल्युमिनियम कव्हर, सेन्सर हे घटक होते. आयईडी अत्यंत सराईतपणे बनविल्याचे तपासात समोर आले. यामागे प्रशिक्षित व स्फोटकांसंबंधी माहिती असलेल्या व्यक्तिचा हात असण्याची शक्यता पोलीसांकडून व्यक्त करण्यात आली.
हॉस्पिटलमध्ये ठेवलेला बॉम्ब वेळीच मिळाला नसता व ठरल्याप्रमाणे मध्यरात्री स्फोट झाला असता असा संशय व्यक्त करत मुश्रीफ यांनी गुप्तचर यंत्रणा व ‘एटीएस’ने अनेक निरपराध मुस्लिमांना अटक केली असती व खोटा तपास करून दोषारोपपत्र पाठविले असते. खरा आरोपी मिळून आला असता तरी त्याला क्लीन चिट दिली असती व त्याला फार तर साक्षीदार केले असते असा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.
हॉस्पिटल स्टाफच्या सतर्कतेमुळे हा बॉम्बस्फोट टळला व आरोपीही मिळाला. पोलीसांनी आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड ही घेतली आहे. पण पोलीस आयुक्त यांनी आधीच त्याला क्लीन चिट दिली असल्यामुळे पोलीस कस्टडी हा फक्त दिखावा आहे हे स्पष्ट होते. तरी पोलीसांनी जनतेची दिशाभूल न करता आरोपीची कसून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
आरोपी अटक होईपर्यंत स्थानिक पोलीस व एटीएस हे योग्य प्रकारे तपास करीत होते. पण आरोपीला अटक होताच कोठून तरी सूत्रे हलली व गुन्ह्याचे चित्रच बदलले. खऱ्या बॉम्बचा बनावट बॉम्ब झाला व दहशतवादी कृत्याचे रूपांतर खंडणी प्रकरणात झाले,असा दावा मुश्रीफ यांनी केला.
पोलीस आयुक्त १४ मे रोजी ती वस्तू कमी शक्तीचा बॉम्ब आहे व त्यात जिलेटीनच्या कांड्या व डिटोनेटर आहे असे सांगतात व दुसऱ्या दिवशी त्यात स्फोटके नव्हती व तो बनावट बॉम्ब होता असे सांगतात. जिलेटीन कांड्या ही स्फोटकेच आहेत हे जर पोलीस आयुक्तांना माहित नसेल तर हे पुण्याच्या जनतेचे दुर्देव आहे. तसेच तो जर बनावट बॉम्ब असता तर प्रथम दर्शनीच बीडीडीएसच्या ते निदर्शनास आले असते व त्यांना नियंत्रित स्फोट करून तो बॉम्ब निकामी करण्याची आवश्यकताच नव्हती. दुसरी बाब म्हणजे आरोपीने हे कृत्य हॉस्पिटल मॅनेजमेंटकडून खंडणी उकळण्यासाठी केले असते तर त्याने बॉम्ब ठेवण्यापूर्वीच पैशाची मागणी केली असती. एकदा बॉम्ब ठेवल्यानंतर तो खंडणीसाठी काय भीती दाखविणार होताॽ तसे त्याला करायचेच होते तर त्याने पुण्यात थांबणे आवश्यक होते. तो नेपाळला का पळून चालला होताॽअसा प्रश्न मुश्रीफ यांनी उपस्थित केला.
एकंदरीत प्रकरणावरून असे दिसून येते की, आरोपीचे हे कृत्य दहशतवादी कृत्यच होते. तो अटक होईपर्यंत कोणी पोलीसांच्या तपासात हस्तक्षेप केला नाही. पण तो अटक होताच सूत्रे हलू लागली. यावरून तो एखाद्या ब्राह्मण्यवादी संघटनेशी संबंधीत असावा व त्याला वाचविण्यासाठी गुप्तचर यंत्रणा व शासनाने पोलीस आयुक्तांवर दबाव आणला असावा असे स्पष्ट दिसून येते, असा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.



