सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल केले आहे. पोटाशी संबंधित समस्येमुळे त्यांना गॅस्ट्रो विभागात भरती केले आहे. डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. गंगाराम रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली. याआधी ७ जून रोजी सोनिया गांधी यांना शिमला येथे मेडिकल चेकअपसाठी नेले होते.
हिमाचलमध्ये ७ जूनला तपासणी झाली. त्यावेळी सोनिया गांधी यांना रक्तदाबाचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना शिमला येथील एका हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले असल्याचे म्हटले गेले होते. हिमाचलचे मुख्यमंत्री सुक्खू यांचे माध्यम सल्लागार म्हणाले होते की, उच्च रक्तदाबाच्या तक्रारीमुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले होते. तपासणी झाल्यावर त्या घरी परतल्या होत्या.
सोनिया गांधी यांना २०२३ मध्ये श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना गंगाराम हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. त्यावेळी डॉक्टर अजय स्वरूप यांनी त्यांना चेस्ट मेडिसिन विभागात ठेवले होते. डॉ. अरूप बसू आणि त्यांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. त्यांना श्वासाच्या त्रासासाठी येथे आणले होते. हा त्रास संसर्गामुळे झाला होता. त्यासंबंधी योग्य उपचार देण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.



