नायजेरियात बंदूकधाऱ्यांचा क्रूर हल्ला; घरात बंद करून जिवंत जाळले, १०० जणांचा मृत्यू

अबुजा : नायजेरियात जातीय आणि धार्मिक हिंसाचाराने पुन्हा एकदा डोके वर काढले. येथे हकनाक १००
गावकऱ्यांना प्राण गमवावे लागले. शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत येलेवाटा या गावात मृत्यूचे तांडव सुरू होते. बंदुकधाऱ्यांनी गावकऱ्यांना घराबाहेर काढून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. इतकेच नाही तर जे लोक घरात लपले होते. त्यांची घरे जाळण्यात आली. त्यात होरपळून अनेक गावकऱ्यांचा मृत्यू झाला.
या हत्याकांडानंतर नायजेरिया सरकारवर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने शनिवारी १४ जून रोजी भल्या पहाटे घडलेल्या या घटनेची माहिती दिली आहे.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या घटनेची माहिती दिली. त्यांच्या मते अजून अनेक लोक बेपत्ता आहेत. अनेक जण या घटनेत गंभीर जखमी आहेत. त्यांना सरकारकडून साध्या उपचाराची सोय सुद्धा करण्यात आली नाही. पुरुषांना बाहेर काढून गोळ्या घालण्यात आल्या. त्यांच्या कुटुंबांना बेडरूममध्ये बंद करून जाळण्यात आले. या घटनेवर जागतिक नेत्यांनी दुख व्यक्त केले आहे.
नायजेरियातील बेनुए राज्यात हिंसेचे लोण पसरले आहे. या हल्ल्यात सर्वाधिक शेतकरी मारल्या जात आहेत. बेनुए हे राज्य नायजेरियाच्या मध्यवर्ती भागात आहे. येथील जमिनीवर भूमाफियांचा डोळा आहे. बेनुए राज्य हे उत्तरेतील मुस्लिम आणि दक्षिणतेली ख्रिश्चन यांचे संगम स्थळ मानण्यात येते. यापूर्वी झालेल्या हिंसाचारात ५०० जणांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत २.२ दशलक्ष लोकांनी हा भाग सोडल्याचा दावा करण्यात येत आहे. हे सध्याच्या काळात, रोहिंग्यापेक्षा सर्वात मोठे स्थलांतर असल्याचे सांगण्यात येते.



