विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना उत, वसुली करणाऱ्या भ्रष्ट पोलिसांवर कारवाईची मागणी
पुणे, विशेष प्रतिनिधी : विमानतळ पोलीस स्टेशनचे नामांतर करून आता दुबई किंवा बँकॉक पोलीस स्टेशन करणे तेवढे शिल्लक राहिले आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली उघडा-नागडा अय्याशीचा बाजार आणि हुक्का बार, जुगार, मटका, गुटखा विक्री आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे बार आणि परमिट रूम, यामुळे शांतता प्रेमी नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे.
सर्वात मोठे मॉल्स व कॉल सेंटर विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत असून कॉल सेंटर मधील गलेलठ्ठ पगार आणि पॅकेज घेणाऱ्या अय्याशबहाद्दरांची तर तोबा गर्दी दिसून येते. पब, डान्सबार, हुक्का बार, मसाज पार्लर सारख्या ठिकाणी तर चारचाकी वाहनांच्या रांगाच रांगा असतात.
विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर मसाज पार्लर जागोजागी सुरू असून त्यामध्ये छुपा वेश्या व्यवसाय मोठ्या झपाट्याने वाढत आहे. हुक्का बार, पानटपऱ्यांवर अवैध गुटखा विक्री, हॉटेलांमध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री असे चित्र असून पब, रूफ टॉफ हॉटेल आणि लेट नाईट हॉटेल पहाटे पर्यंत सुरू असतात. ती सुरू ठेवण्यासाठी स्थानीक पोलिसांना लाच द्यावी लागते अशी जोरदार चर्चा आहे.
विमान नगर परिसरासह शहरातील विविध भागात एकापेक्षा अनेक ठिकाणी मसाज पार्लर चालवणारे आनुज, प्रिया आणि गनराज नावाची व्यक्ती अनेक परप्रांतीय युवक व युवतींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नावे मसाज पार्लरचा करार करून या युवकांना मालक म्हणून बसवले जाते. आणि बाहेरून स्थानीक पोलिसांना हाताशी धरून स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत असून यांनी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर अय्याशीचा बाजार मांडला आहे. अशा बेकायदेशीर मसाज पार्लर मधून लाखो रुपये कमवले जातात आणि हाताशी धरलेल्या पोलिसांना मनासारखा हप्ता दरमहा दिला जातो. त्यामुळे या बेकायदेशीर मसाज पार्लरवर स्थानीक पोलिसांचा वरदहस्त लाभला आहे की काय अशी चर्चा प्रामाणिकपणे मसाज पार्लर व्यवसायिकांमध्ये आहे. अशा अवैध धंदे करणाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे व कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या मसाज पार्लरवर बदनामी आणि तोटा यांची संक्रांत कोसळली आहे. त्यामुळे पोलिसांप्रती यांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाल्याचे चित्र आहे.
पोलीस आयुक्तांची कारवाई निष्प्रभ ठरली की काय ?
विमानतळ पोलिस ठाण्यातील शयलेस नाeक नावाचा पोलीस कर्मचारी अवैध धंदेवाल्यांकडून वसुली करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच या अवैध धंद्यांना मोकळे रान मिळाले असून सामान्य नागरिक त्रस्त असल्याने त्यांच्या पैकी अनेकांनी वसुली करणाऱ्या भ्रष्ट पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी ‘महाराष्ट्र मिशन’ कडे केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मध्यंतरी ‘ कलेक्टर ‘ पोलिसांना अद्दल घडवून त्यांची बदली पोलीस मुख्यालयात केली होती. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे शहरात वसुली बहादरांना चाप बसला होता. त्यानंतर सुद्धा ‘डर के आगे जीत है’ म्हणत विमान नगर परिसरामध्ये अवैध धंदे जोमात सुरू असून या अवैध धंद्यावाल्यांकडून वसुली सुरूच असल्याने पोलीस आयुक्तांची कारवाई निष्प्रभ ठरली की काय अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये व पोलीस दलातील शिस्तप्रिय पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
मसाज सेंटरमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल
मुंबई येथील स्पा सेंटरमध्ये, काम करणाऱ्या, मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. याची गंभीर दखल शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे.
राज्यातील सर्व स्पा, मसाज सेंटर, पार्लर येथे गैरप्रकार रोखण्यासाठी निरीक्षण मोहिम राबविण्यात यावी. स्पा, मसाज सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुली व महिला यांच्या सुरक्षितेची संपूर्ण जबाबदारी स्पा चालक यांची राहील याचे प्रतिज्ञापत्र परवाना देताना घेण्यात यावे. याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव, गृहविभाग यांना स्पा, मसाज सेंटर मधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.



