खाकी वर्दीचा ‘डार्क’ चेहरा! पर्यटकांना गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; तीन पोलीस, तीन वार्डन गजाआड

पुणे : पुणे-लोणावळा मार्गावर पर्यटकांना गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून ५ लाख रुपयांची खंडणी मागणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, खंडणी मागणारे अन्य कोणी नसून चक्क हायवे पोलीस आणि वार्डन आहेत. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात ३ पोलीस आणि ३ वार्डन अशा एकूण ६ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
राज्य महामार्ग पुणे विभागाचे पोलीस शिपाई अमोल नन्नवरे, तुषार ढावरे, पोलीस नाईक अमोल वायकर आणि तीन वार्डन अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी भूषित उमेश शर्मा (वय २८, रा. विमाननगर, पुणे) हे त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांसह लोणावळ्याला जात असताना कामशेतजवळील ताजे गाव येथे ही घटना घडली.
अंबर दिवा असलेल्या झायलो कारमधून आलेल्या पोलिसांनी शर्मा यांची गाडी तपासणीच्या नावाखाली अडवली. “आम्ही महामार्ग वाहतूक पोलीस आहोत, तुमच्या मोटारीतील गांजा आणि ड्रग्ज काढून द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल,” अशी धमकी देऊन त्यांना घाबरवण्यात आले. दरम्यान, तक्रारदाराच्या मित्राकडे असलेल्या सिगारेट पाकिटाचा आधार घेत “पोलीस कारवाई टाळायची असेल तर ५ लाख रुपये द्या,” अशी मागणी या खंडणीखोर पोलिसांनी केली.
पैसे उकळण्यासाठी पोलिसांनी या पर्यटकांना तळेगाव येथील एटीएम केंद्रावर नेले. मात्र, पर्यटकांनी समयसूचकता दाखवत आपल्या स्मार्टवॉचवरून पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली. आपला भांडाफोड होणार हे लक्षात येताच, आरोपी पोलिसांनी पर्यटकांना तिथेच सोडून आपल्या गाडीतून पळ काढला.
सुरुवातीला हा प्रकार भामट्यांचा असावा असा संशय होता, मात्र तपासात हे अपहरणकर्ते अधिकृत पोलीस असल्याचे समोर आल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. राज्य महामार्गाचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी या कारवाईची माहिती दिली असून, खाकी वर्दीचा वापर करून पर्यटकांना लुटणाऱ्या या टोळीवर आता कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.



