पुणे शहर

पुण्यात आठवलेंची राजकीय फटकेबाजी: ‘उद्धव ठाकरेंचे आणखी १४-१५ आमदार फुटणार!

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी महिला आरक्षण, महाविकास आघाडीतील संभाव्य आमदार फुटी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भवितव्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, पूर्वी विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला होता, परंतु आता संसदेत संख्याबळ वाढल्याने लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक नक्कीच मंजूर होईल. तसेच, आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत महिलांना अधिक जागा मिळतील आणि मतदारसंघांची पुनर्रचना करणारे डीलिमिटेशन बिलही बहुमताच्या जोरावर पास होईल.

महाविकास आघाडीकडून होणाऱ्या पक्षफुटीच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांना त्यांचे खासदार-आमदार सांभाळता येत नाहीत, असे सांगत त्यांनी हे त्यांचे वैयक्तिक ऑपरेशन असल्याचे म्हटले. बाळासाहेब ठाकरेंचे विचार डावलून उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या २० पैकी आणखी १४ ते १५ आमदार फुटण्याची शक्यता आठवलेंनी वर्तवली. हे आमदार महायुतीत आल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांचे स्वागतच केले जाईल, असा दावा त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीए प्रवेशाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत; २०१४ किंवा २०१९ मध्ये ते एनडीएसोबत आले असते, तर ते देशाचे राष्ट्रपती झाले असते. तसेच, अजित पवार नसल्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चेवर आठवले म्हणाले की, “माझ्या मते देवेंद्र फडणवीस हे २०२९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. ते सर्व घटकांना न्याय देत असल्याने सध्या त्यांना दिल्लीत नेण्याची कोणतीही आवश्यकता नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page