पुणे-नाशिक महामार्गावर पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांचा हवेत गोळीबार

मंचर : तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथील ऋषी पेट्रोल पंपावर पिस्तूलचा धाक दाखवून चार चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी पेट्रोल पंपाच्या काऊंटरमधील १ लाख ९० हजार ३७० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. याबाबत आकाश मच्छिंद्र डोके यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तांबडेमळा (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतील ऋषी पेट्रोल पंपावर रात्री ९.३०च्या दरम्यान दुचाकीवर आलेले दोन चोरटे पेट्रोलपंपाच्या ऑफिसमध्ये घुसले तर दोघेजण बाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबले होते. आत आल्यावर चोरट्यांनी आतील कर्मचा-यांवर पिस्तूल रोखले. बाहेरील कर्मचा-याला आत नेले. पिस्तूलचा धाक दाखवून चोरट्यांनी कर्मचा-यांकडे पैशाची मागणी केली.
घाबरलेले कर्मचारी हात वर करून उभे राहिले. त्यावेळी त्यातील एका चोरट्याने ड्रॉवर उचकण्यास सुरुवात केली. यावेळी चोरटे त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होते. पैसे काढून द्या नाहीतर जीवे मारू, असे म्हणून चोरट्यांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले १ लाख ९० हजार ३७० रु. घेऊन बाहेर आले. चौघेही चोर एकाच मोटारसायकलवर आले होते. चोरी करून परत चालत जाताना १५० मीटर अंतरावर पंपावरील कर्मचारी पकडतील या भीतीने त्यातील एका चोरट्याने हातातील पिस्तुलाने हवेत गोळीबार केला.



