
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने रविवारी क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी २० सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारी ती जगातील चौथी आणि भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात स्मृतीला ऐतिहासिक टप्पा आणि मैलाचा दगड गाठण्यासाठी केवळ २७ धावांची गरज होती. तिने शानदार सुरुवात करत ही धावसंख्या पूर्ण केली आणि क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत आपले नाव कोरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ मिताली राज (भारत), शार्लेट एडवर्ड्स (इंग्लंड) आणि सुझी बेट्स (न्यूझीलंड) या तिघींनाच १० हजार धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. त्यापाठोपाठ आता स्मृती मानधना हिने या यादीत स्थान मिळवले आहे.




