पिंपरी-चिंचवडपुणे शहरमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर

५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी - राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१ ; तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

येथील सह्याद्री अतिथिगृहात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीची सूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर पार पाडतील. मतदान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.

संबंधित क्षेत्रात आचारसंहिता

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. संबंधित क्षेत्रात ही आचारसंहिता लागू झाली असली तरी अन्य ठिकाणीदेखील संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही; परंतु नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल.

दोन मते देणे अपेक्षित

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. त्यामुळे एका मतदाराने दोन मते देणे अपेक्षित असते.

‘मताधिकार’ मोबाईल ॲप

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते सध्या फक्त ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. त्यात मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे.

प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचार समाप्तीसंदर्भात संबंधित विविध अधिनियमांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांसह कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येत नाहीत. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ‘२८ब(१)’ अन्वये जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी २४ तास अगोदर प्राचाराची समाप्ती होईल. त्यानुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत असल्यामुळे मतदानाच्या दिनांकापूर्वी २४ तास अगोदर म्हणजे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी रात्री १२ वाजता जाहीर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यानंतर जाहिरातींची प्रसिद्धी आणि प्रसारणही बंद होईल; परंतु अन्य अधिनियम/ नियमांतील तरतुदींनुसार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेनंतर सभा/ प्रचारफेऱ्या/ ध्वनिक्षेप आदींचा अवलंब करता येणार नाही.

प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका

राज्य निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५’ च्या परिच्छेद २० नुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्रावरील प्रवेशासाठी प्रवेशिका दिल्या जातील.

जिल्हा परिषदेच्या जागांचा तपशील

⬛ एकूण जिल्हा परिषदा- १२

⬛ एकूण जागा- ७३१

⬛ महिलांसाठी जागा- ३६९

⬛ अनुसूचित जातींसाठी जागा- ८३

⬛ अनुसूचित जमातींसाठी जागा- २५

⬛ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- १९१

पंचायत समित्यांच्या जागांचा तपशील

⬛ एकूण पंचायत समित्या- १२५

⬛ एकूण जागा- १,४६२

⬛ महिलांसाठी जागा- ७३१

⬛ अनुसूचित जातींसाठी जागा- १६६

⬛ अनुसूचित जमातींसाठी जागा- ३८

⬛ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- ३४२

महत्वाच्या तारखा

⬛ जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी- १६ जानेवारी २०२६

⬛ नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- १६ ते २१ जानेवारी २०२६

⬛ नामनिर्देशनपत्रांची छाननी- २२ जानेवारी २०२६

⬛ उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- २७ जानेवारी २०२६

⬛ निवडणूक चिन्ह वाटप- २७ जानेवारी २०२६

⬛ अंतिम उमेदवारांची यादी- २७ जानेवारी २०२६

⬛ मतदानाचा दिनांक- ५ फेब्रुवारी २०२६

⬛ मतमोजणीचा दिनांक- ७ फेब्रुवारी २०२६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page