संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची आत्महत्या

परभणी : परभणी जिल्ह्यातील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार याने आपल्या शेतामधील राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. जामीनावर सुटून घरी परतल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. परभणी रेल्वे स्थानकासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या भारतीय संविधानाची विटंबना केली होती. या घटनेनंतर परभणी शहरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. विविध संघटना, नागरिक आणि आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. काही ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि मोठ्या प्रमाणावर दंगलसदृश स्थितीही पाहायला मिळाली होती. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दत्ता पवार यांना अटक केली होती. संविधानाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर न्यायालयाने त्यांना ११ महिन्यानंतर जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या गावी आणून सोडलं होतं.



