ठाकरेंच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी ५ ते १५ कोटींची ऑफर
राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : कल्याण डोंबिवलीत भाजपची माणसे पैसे वाटतात आणि त्यांना शिंदेंची माणसे पकडून मारतात, ही अशी अवस्था आपण पाहत आहोत. यांनी जर विकास केला असता तर त्यांना मताला पाच-पाच हजार का द्यावे लागत आहेत, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. तसेच कल्याण डोंबिवलीत भाजपने ठाकरेंच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी ५ ते १५ कोटींची ऑफर दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. असे असतानाही न विकले जाता आमचे उमेदवार लढत आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी ते सगळे उमेदवार लोकांच्या समोर आणले.
ठाण्यात ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या काही उमेदवारांना समोर आणले. भाजपकडून मताला पाच हजार दिले जात आहेत. मला देणा-यांची चिंता नाही तर घेणा-यांची चिंता आहे. उद्या यांची मुले काय म्हणतील, आमचे आई-वडील पाच-पाच हजारांना विकले गेले, असे राज ठाकरे म्हणाले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत झालेल्या बिनविरोध निवडीवर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, पूर्वी जसा गुलामांचा बाजार मांडला गेला, तसा बाजार आता कल्याण-डोंबिवलीमध्ये मांडला गेला. एकेका उमेदवाराला पाच-पाच कोटी रुपये ऑफर देण्यात आली.
आपल्या पक्षाचे शैलेश धात्रक, मनिषा धात्रक आणि पूजा धात्रक हे एकाच कुटुंबातील तिघेजण निवडणुकीला उभारले आहेत. त्यांना प्रत्येकी पाच कोटी अशी १५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. तरीही १५ कोटींची ऑफर नाकारून ते तिघेही निवडणुकीला उभे राहिले. दुसरे उमेदवार राजश्री नाईक… त्यांना पाच कोटींची ऑफर देण्यात आली. सुशील आवटे यांना एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, ती त्यांनी नाकारली, असे राज ठाकरे म्हणाले.



