बारामतीत बुलेट चोरट्याचा सुळसुळाट संपुष्टात; ३० लाखांच्या गाड्यांसह सराईत गजाआड, १९ गुन्हे उघड
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वापरत होता सरकारी पाट्या; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

राकेश लोंढे / बारामती प्रतिनिधी : बारामती शहर तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. या गंभीर प्रकारची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बारामती पोलिसांनी विशेष पथके तयार करून रात्रीची गस्त व पेट्रोलिंग तीव्र करण्याचे निर्देश दिले होते. याच मोहिमेदरम्यान पोलिसांनी एका सराईत चोरट्याला बेड्या ठोकून त्याच्याकडून तब्बल ३० लाख रुपये किमतीच्या १९ मोटारसायकल (ज्यात १३ बुलेट गाड्यांचा समावेश आहे) हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे बारामती परिसरातील तब्बल १९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला सराईत चोरटा
स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पथके बारामती शहर परिसरात गस्त घाजत असताना, पेन्सील चौककडून मेडिकल कॉलेजकडे एका संशयित इसमाने चोरीची बुलेट मोटारसायकल घेऊन जाण्याबाबतची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली. मिळवलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मेडिकल कॉलेज परिसरात सापळा रचला.
काही वेळातच एक इसम चोरीची बुलेट घेऊन जाताना पोलिसांना दिसला. पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सधानंद बाबुराव काळे (वय २३ वर्षे, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असल्याचे सांगितले.
चोरीची अनोखी शक्कल आणि गुन्ह्यांची कबुली
विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, आरोपी रात्रीच्या वेळी बनावट व्ही.आय.पी. नंबर प्लेट लावून बुलेट व इतर मोटारसायकल चोरायचा. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो चोरी केलेल्या वाहनांवर ‘महाराष्ट्र पोलीस’, ‘महाराष्ट्र वनसेवा’, ‘इस्टी महामंडळ’ अशा पाट्या लावून फिरत असे, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही.
त्याच्या या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ३० लाख रुपये किमतीच्या एकूण १९ मोटारसायकल्स जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये १३ बुलेट आणि ६ इतर गाड्यांचा समावेश आहे.
जप्त केलेल्या वाहनांमध्ये खालील काही गाड्यांच्या नंबर प्लेट्सचा समावेश आहे:
MH 42 BK 3003, MH 42 AV 2121, MH 42 BK 0749, MH 42 BK 9709, MH 42 BD 9490, MH 42 AT 5455, MH 42 AZ 0374, MH 42 AZ 1616
MH 42 AB 1212, MH 42 TG 2677, MH 42 AV 7869, MH 42 UQ 0303, MH 42 EA 9977

पोलिस पथकाचे उल्लेखनीय योगदान
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुधीर वडूजकर, अंमलदार बाळसाहेब कारूंडे, शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलताना डोंगरे, तुषार चौरे, रईस मुल्ला, गणेश ढेरे तथा बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पथकाने संयुक्तपणे पार पाडली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून बारामती तालुका पोलिसांकडून पुढील कसून तपास सुरू आहे.



