चांदी १० टक्क्यांनी ‘क्रॅश’, तर सोन्याच्या दरात मोठी घसरण

नवी दिल्ली : आठवड्याच्या सुरुवातीला उसळी घेतलेल्या सोन्या-चांदीच्या दरांना अचानक जोरदार धक्का बसला आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या मजबुतीमुळे मौल्यवान धातूंवरील गुंतवणूकदारांचा उत्साह ओसरताना दिसतोय.
काही तासांतच दरांत मोठी घसरण नोंदवली गेल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. पुढील काळात किमती कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला तेजी दाखवल्यानंतर गुरुवारी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरांना मोठा फटका बसला. जागतिक बाजारातील विक्रीचा दबाव, अमेरिकन डॉलर मजबूत होणे आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीसह प्रमुख शहरांत चांदीच्या दरात सुमारे १० टक्क्यांची पडझड झाली असून सोन्याचे दरही लक्षणीयरीत्या खाली आले आहेत.
दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा दर प्रतिकिलो २.९८ लाख रुपयांवरून थेट २.६८ लाख रुपयांपर्यंत घसरला. सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम १.६५ लाख रुपयांवरून १.६० लाख रुपयांपर्यंत खाली आला. MCX वायदे बाजारातही मार्च डिलिव्हरीची चांदी सुमारे १० टक्क्यांनी घसरली, तर एप्रिल डिलिव्हरीचे सोने १.५ टक्क्यांहून अधिक घसरले. जागतिक बाजारात मौल्यवान धातूंवर विक्रीचा दबाव वाढला असून अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोने-चांदीवरील गुंतवणूकदारांचा कल कमी झाला आहे. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर दीर्घकाळ उच्च राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीतील आकर्षण तात्पुरते कमी झाले आहे.



