गडचिरोलीत नक्षलवाद अखेरच्या श्वासावर; ३ दिवसांच्या मोहिमेत ७ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद आता अखेरच्या श्वासावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबूजमाड जंगल परिसरात ३ फेब्रुवारीच्या रात्रीपासून सलग तीन दिवस सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान झालेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी ७ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
ज्यात चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या चकमकीत एक सी६० कमांडो शहीद झाले आहे, तर इतर दोन जवानांना गोळ्या लागल्या आहेत. जखमी जवानांना घटनास्थळावरून गडचिरोली मुख्यालयात हेलिकॉप्टरने हलवण्यात आले.
ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये प्रभाकर उर्फ रवी उर्फ स्वामी, पागु मोडम, अनिला उर्फ बुदरी कोवाची, कामेश पदा, भजनाथ उर्फ भिमा होळी, मंगली कुरसाम आणि जोगी सोढी-मडावी यांचा समावेश आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर राज्य सरकारने मिळून ७१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
प्राप्त माहितीनुसार, अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांच्या पथकाद्वारे शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत सी-६० पथकाचे कॉन्स्टेबल दीपक चिन्ना मडावी(३८) मूळ गाव मांड्रा(दामरंचा),ता.अहेरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना हेलिकॉप्टरने भामरागड उप-जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जखमी जवान जोगा मडावी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील उपचारांसाठी गडचिरोली येथे नेण्यात आले आहे.
शहीद मडावींना मदत…
वीरगती प्राप्त झालेले जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २.२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचीही घोषणा करण्यात आली.

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
घटनेच्या ठिकाणाहून पोलिसांनी ३ एके-४७ रायफल, १ एसएलआर, १.३०३ रायफल अशी एकूण ५ अत्याधुनिक अग्निशस्त्रे जप्त केली आहेत. याव्यतिरिक्त १७३ जिवंत काडतूस, ३ बीजीएल, ७ मॅगझिन, कॉर्टेक्स वायर आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात केवळ सात नक्षली शिल्लक
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईनंतर आता संपूर्ण जिल्ह्यात केवळ ७ सशस्त्र नक्षली शिल्लक राहिले आहेत. यातील पाच जण छत्तीसगडमधील असून केवळ दोनच गडचिरोलीचे आहेत. त्यांनी आत्मसमर्पण करावे, अन्यथा ३१ मार्चपर्यंत त्यांचाही बीमोड केला जाईल,” असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या यशस्वी मोहिमेमुळे नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोला मोठा धक्का बसला आहे. पत्रकार परिषदेला पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोलीतील सी- ६० जवान आणि पोलिसांच मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
गडचिरोली पोलिसांच्या सी- ६० जवान आणि पोलिसांच अभिनंदन करतो. अतिशय महत्त्वाचा ऑपरेशन त्यांनी केले. नक्षलवाद्याची एकच कंपनी आता राहिली होती. त्यातले मेजर ७ मारले गेले. गडचिरोलीतल्या आतापर्यंतचा सर्वात कठीण ऑपरेशन होतं. तीन दिवस गडचिरोली पोलीस ऑपरेशन करत होते. ते डेन्स एरियामध्ये यापूर्वी कधीही ऑपरेशन केलं नव्हतं. डेन्स असा एरिया होता.. प्रचंड गोळ्यांचे प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यांचा मोरक्या असलेला प्रभाकर यालाही मारण्यात आलं.
महाराष्ट्राच्या साईडला बोटावर मोजणारे तीन ते चार नक्षलवादी राहिलेले आहे. वेगाने नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांचं काम अत्यंत उत्तम आहे. दुर्दैवाने एक पोलीस कर्मचारी शहीद झाले आहे. बुलेटप्रूफ जॅकेट असताना त्या ठिकाणी स्ट्रॅटेजीक पद्धती गोळी लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्यांना आदरांजली अर्पण करतो. या कारवाईसाठी पोलीस विभागाचे मनापासून अभिनंदन करतो.



