५ कोटी ८४ लाख रुपयांची फसवणूक करुन बापलेक फरार

पुणे : ७४ वर्षीय ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक पद्मा मोतीलाल गादीया यांची सुमारे ५ कोटी ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जयंतीलाल बभूतमल जैन व नवीन जयंतीलाल जैन या बापलेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बांधकाम व व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली. गुन्हा नोंद होताच दोघेही फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत कोंढवा पोलिस ठाणे येथे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात संबंधित बापलेकांनी पद्मा गादीया यांची सुमारे ५ कोटी ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीत घडल्यामुळे भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळताच आरोपी बापलेकांनी पलायन केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी तपास अधिकारी दत्तात्रय भापकर यांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.



