ओडिशातील रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये आग; १० रुग्णांचा मृत्यू.

कटक : कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या ‘ट्रॉमा आयसीयू’ मध्ये सोमवारी पहाटे सुमारे २:३० वाजता आग भडकली. वातानुकूलित यंत्रातील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
अग्निशमन दलाने ही आग विझवली; मात्र या दुर्घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला (७ रुग्णांचा जागीच, तर ३ रुग्णांचा बचावकार्यादरम्यान मृत्यू झाला). रुग्णांना वाचवण्याच्या प्रयत्नात रुग्णालयातील ११ कर्मचारी भाजले.
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर इमर्जन्सी विभागातील आयसीयूमध्ये सोमवारी पहाटे साधारण ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. पहिल्या मजल्यावर असलेल्या या विभागात त्यावेळी अनेक गंभीर रुग्ण उपचार घेत होते. अचानक धूर पसरू लागल्याने आणि आग भडकू लागल्याने रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला.
आगीचे आणि धुराचे लोट पाहताच डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णांचे नातेवाईक यांनी तात्काळ रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न सुरू केला. काही रुग्णांना स्ट्रेचरवरून तर काहींना हातावर उचलून दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मात्र आयसीयूमधील काही रुग्ण आधीच गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना वाचवता आले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, आयसीयूमध्येच ७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तीन रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमद्धे हलवताना धुरामध्ये गुदमरून किंवा प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.



