न्यायालयाच्या आदेशानंतरही बंडू आंदेकरची घोषणाबाजी

पुणे : नातवाच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंडू आंदेकरला पुणे मनपा निवडणूक लढवण्यास सत्र न्यायालयाकडून सशर्त परवानगी देण्यात आली. पोलिस बंदोबस्तात बंडू आंदेकरला निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आला. मात्र कोणतीही मिरवणूक, प्रचार यात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक भाषणे करू नये, अशी ताकिद न्यायालयाने देऊनही तो एकटाच घोषणा देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यावर पोलीस काय कारवाई करणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
बंडू आंदेकरची भावजय, माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, माजी नगसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांना निवडणूक लढविण्यासाठी पुण्याच्या विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे.
वनराज आंदेकरच्या खुनानंतर दोन्ही कौटुंबिक टोळ्यांमधील संघर्ष वाढला होता. याच वैमनस्यातून आयुष कोमकरची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी टोळीप्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकरसह कुटुंबातील नऊ सदस्यांसह १५ जणांना पोलिसांनी अटक केली. अटक झालेल्या आरोपींपैकी १२ जण पोलिस कोठडीत आहेत, तर लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
बंडू आंदेकर याने कोणतीही मिरवणूक, प्रचार यात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक भाषणे करू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र पोलिसांसमोर आंदेकर याने घोषणाबाजी करु नये या आदेशाचा भंग केला. आंदेकर ‘व्हिक्टरी’ ची खूण करत निवडणूक कार्यालयात जाताना स्वतः च्या घोषणा देत गेला. पोलिसांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी आंदेकर याला रोखणे आवश्यक होते असे जाणकारांचे मत आहे.
अर्जामध्ये काही त्रुटी असल्याने आंदेकर याला सोमवारी पुन्हा पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालयात आणण्यात येणार होते. या दरम्यान न्यायालयीन आदेशाच्या भंगाबद्दल पोलीस काय भूमिका घेतात याचे औत्सुक्य आहे.



