
पुणे: तरुणांमधील ड्रग्ज सेवन (अंमली पदार्थाचे सेवन) ही सध्या पुणे शहरातील एक गंभीर समस्या बनली आहे. ड्रग्स रॅकेट उघडकीस आणणे, मोठ्या प्रमाणात जप्ती करणे सेवन करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करणे या कारवाईनंतर प्रतिबंधात्मक आणि जनजागृतीपूर्ण उपक्रमांची गरज असल्याने नशामुक्त तरुणाई पुणे पोलीस स्वयंसेवक मोहीमेस (NO DRUGES VOLUNTEER) प्रारंभ करण्यात आला.
‘नशामुक्त तरुणाई पुणे पोलीस स्वयंसेवक मोहीम’ ही पुणे शहरातील इतर शाळा, कॉलेजेस मध्ये देखील घेण्यात येणार असून जास्तीत जास्त तरुणांनी त्यात सहभाग घेण्याचे आवाहन केले. या मोहिमेत पुणे शहरातून एक लाख विद्यार्थ्यांना जोडण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे.
अंमली पदार्थामुळे तरुणांचे होणारे नुकसान व व्यसनाधिन तरुणांमुळे त्यांच्या कुटुंबाचे होणारे नुकसान यावर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार पोलीस यांनी सखोल मार्गदर्शन केले. अमितेशकुमार यांनी जास्तीत जास्त तरुण व तरुणी यांनी NO DRUGES VOLUNTEER नशामुक्त तरुणाई स्वयंसेवक व्हावे व अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत पोलीस दलास अंमली पदार्थ विक्री करणारे व सेवन करणारे यांच्यावर कारवाई करण्यास मदत करावी. पुणे शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस दलासह काम करावे याबाबत मार्गदर्शन केले.
लष्कर भागातील आझम कॅम्पसच्या असेम्बली हॉल मध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ नशामुक्त तरुणाई पुणे पोलीस स्वयंसेवक मोहीम (NO DRUGES VOLUNTEER) सुरू करण्यात आली. पुणे पोलीस, लष्कर पोलीस स्टेशन व डॉ. पी.ए. इनामदार युनिव्हर्सिटी, अवामी महज, पद्मपाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातून अंमली पदार्थाचे समूळ उचाटन करण्यासाठी तरुणांनी NO DRUGES VOLUNTEER) या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा याबाबत अमितेशकुमार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त, (विशेष शाखा) डॉ. संदिप भाजीभाकरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग संगिता अल्फान्सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन संतोष खेतमाळस, तसेच एम.सी.ई.सी सोसायटीच्या अध्यक्षा आबेदा इनामदार, विश्वस्त आय. पी. इनामदार, पद्मपाणी फाऊंडेशन अध्यक्ष राहुल डंबाळे तसेच डॉ.पी.ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर शिक्षक व २०० ते २५० विद्यार्थी उपस्थित होते.
पोलीस उप आयुक्त ( गुन्हे शाखा) निखील पिंगळे यांनी अंमली पदार्थाचे सेवन केल्यावर होणारे परिणाम याबाबतचे पॉवरपॉईंट सादरीकरण करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दरम्यान पुणे पोलीस डॉग स्कॉड यांच्याकडून कशाप्रकारे अंमली पदार्थ शोधले जातात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन यांनी आभार प्रदर्शन करुन केली.



