मुंबईसामाजिक

अमेरिका- इराण युद्धविरामामुळे शेअर बाजार वधारला

गुंतवणूकदारांना १४ लाख कोटी रुपयांचा नफा

मुंबई : अमेरिका- इराण या युद्धाच्या सावटाखाली असलेल्या शेअर बाजार युद्धविरामामुळे वधारला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ५० मध्ये जवळपास ३.५ टक्क्यांची तेजी दिसली असून बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये १४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

युद्ध बंदी जाहीर होताच जगभरातील शेअर बाजार वधारला असून भारतीय शेअर बाजारालाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना झटका बसला. पण आता सुगीचे दिवस आले आहेत. एका घोषणेने बाजाराचा मूड बदलला असून बुधवारी आशियातील बाजारात ५ टक्क्यांची तेजी दिसली. तर आज सकाळी भारतीय शेअर बाजार चमकून उठला. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या रेघा हिरव्या रंगात न्हाऊन निघाल्या. दोन्ही निर्देशांक जवळपास ३.५ टक्क्यांनी धावला. अवघ्या काही मिनिटात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास १४ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली.

सकाळच्या सत्रात बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये जवळपास २८२२अंकांची तेजी दिसली. सेन्सेक्स ७७,४३९ अंकावर ट्रेड करत होता. तर एनएसई निफ्टी ८०० अंकांनी वधारला. निफ्टी २३,९४९ अंकावर ट्रेड करत होता. या काळात सेन्सेक्सच्या ३० पैकी २९ कंपन्यांमध्ये तेजीचे सत्र दिसले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये ८.२ टक्के, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये ९ टक्के तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये ८.८ टक्क्यांची वाढ दिसली.

शेअर बाजारातील तेजीच्या सत्रात एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि सनफार्मा या कंपन्यांना मात्र सूर गवसला नाही. तर इंडिगोच्या शेअरमध्ये ९ टक्क्यांची तेजी दिसली. मारुती, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स या शेअरमध्ये ६ टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी दिसली.

निफ्टी मधील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या शेअर्समध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, एल अँड टी, श्रीराम फायनान्स, अदाणी पोर्ट्स आणि अदाणी एंटरप्रायजेस यांचा समावेश होता. तर ओएनजीसी, कोल इंडिया आणि टेक महिंद्रा हे शेअर्स सर्वाधिक घसरण नोंदवणारे ठरले.

ट्रम्प यांच्या युद्धबंदीनंतर दोन आठवडे मध्य-पूर्वेत मोठी शांतता राहील. याभागातून येणारा इंधन पुरवठा आता सहज होईल. तर दुसरीकडे इंधनाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जगात सुरु असलेले तेल संकट टळले आहे. त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. त्यामुळे शेअर बाजारात आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page