दिल्ली पोलिसांकडून शस्त्रास्त्र पुरवणा-या नेटवर्कचा फर्दाफास

नवी दिल्ली : दिल्ली पोलिस गुन्हे शाखेने शनिवारी एका मोठ्या कारवाईत ‘आयएसआय’पुरस्कृत आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र पुरवणा-या नेटवर्कचा पर्र्दाफाश केला आणि याप्रकरणी चार तस्करांना अटक केली. या नेटवर्कचा उद्देश दिल्ली-एनसीआरमधील टोळ्यांना तुर्कि आणि चीनमध्ये बनवलेल्या अत्याधुनिक पिस्तूलचा पुरवठा करणे हा होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून १० अत्याधुनिक पिस्तुले आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत.
जप्त करण्यात आलेली शस्त्रे ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानातून भारतात, विशेषत: पंजाबमध्ये आणली जात होती. त्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील तस्कर ही शस्त्रे दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील गुन्हेगारी सिंडिकेटस्ना पोहोचवत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मनदीप, अजय, दलविंदर आणि रोहन अशी असून ते पंजाब आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. हे आरोपी लॉरेन्स बिष्णोई, गोगी, बंबीहा आणि हिमांशू भाऊ यांच्यासारख्या प्रमुख गुंडांच्या टोळ्यांना शस्त्रे पुरवणा-या मॉड्यूलचा भाग होते.



