पंतप्रधान मोदींना ताश्कंदमध्ये सर्वोच्च सन्मान प्रदान!
नवी दिल्ली / ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या उझबेकिस्तान दौऱ्यात भारत आणि उझबेकिस्तानमधील संबंध अधिक दृढ करण्याबाबत ऐतिहासिक निर्णय झाले आहेत. ताश्कंद येथे उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्झियोयेव यांनी पंतप्रधान मोदी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करून गौरव केला.
दोन देशांच्या उच्चस्तरीय बैठकीत आर्थिक, व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि सामरिक भागीदारीवर सविस्तर चर्चा झाली. या वेळी परराष्ट्र मंत्री स्तरावर ‘समन्वय परिषद’ स्थापन करणे, संयुक्त आयोगाची पातळी मंत्री स्तरावर नेणे, ‘व्यासायिक शिखर परिषद’ आयोजित करणे आणि युरेनियम पुरवठ्यासाठी दीर्घकालीन व्यवस्था उभारणे यांसारखे महत्त्वाचे करार झाले. तसेच दोन्ही देशांमध्ये तीन ‘भगिनी-शहर’ व ‘भगिनी-राज्य’ व्यवस्था सुरू करण्याचे ठरले.
राष्ट्रपती मिर्झियोयेव यांनी भारताच्या वेगवान प्रगतीचे आणि डिजिटलीकरण, एआय (AI), अंतराळ क्षेत्रातील यशाचे कौतुक केले. या यशस्वी दौऱ्यामुळे भारत आणि मध्य आशियातील संबंधांना नवी उंची मिळणार आहे.



