कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची गोळ्या झाडून हत्या; टोरंटो पोलिसांकडून आरोपी गजाआड!

टोरंटो (कॅनडा) : कॅनडामधील टोरंटो शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे भारतीय वंशाच्या एका २६ वर्षीय तरुणीची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा एक पूर्वनियोजित ‘टार्गेट हल्ला’ असल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नवनीत कौर (२६) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी टोरंटो पोलिसांनी शरणजीत सिंग या आरोपीला ब्रॅम्प्टन येथून अटक केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी ७:२३ वाजता टोरंटो पोलिसांना हंबरवुड बुलेवर्ड आणि रेक्सडेल बुलेव्हार्ड परिसराजवळ एक तरुणी गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिला अज्ञातांनी गोळ्या घातल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणीला वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
आरोपीवर गंभीर आरोप आणि तपास सुरू
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी शरणजीत सिंग याला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर ‘फर्स्ट-डिग्री खून’ आणि न्यायालयाच्या हमीपत्राचे उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपीने नवनीत कौर यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, याचे मूळ कारण अद्याप समोर आलेले नाही. टोरंटो पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कॅनडामधील भारतीय समुदायात हळहळ व्यक्त होत आहे.



