जुन्या वादातून महिलेने केला महिलेचा खून

छत्रपती संभाजी नगर: एका महिलेने थेट घरात घुसून चाकूने सपासप वार करीत विवाहितेची हत्या केली. दिवसाढवळ्या, लोकवस्तीत घडलेल्या या रक्तरंजित घटनेने बजाजनगरचा संपूर्ण परिसर हादरून गेला.
साधना महेंद्र सोनपेटकर (४०, रा. साई श्रद्धा पार्क, वडगाव को.) असे मृत महिलेचे नाव आहे. शैला सुनील सोनार ( ४५, रा. बजाजनगर) या आरोपी महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने वाळूज परिसर हादरला. मृत साधना यांना दोन मुले आहेत.
बुधवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास आरोपी शैला ही साधना सोनपेटकर यांच्या घरी आली तेव्हा घरात साधना यांच्या सासू केशरबाई एकटचाच होत्या. शैलाने त्यांना साधना कुठेय? असे विचारले. केशरबाई यांनी ती मंदिरात गेल्याचे सांगितले. तेव्हा, आरोपी तिथेच थांबली. साधना घरी आल्या व त्यांनी शैलाला तेथे पाहून तू इथे का आलीस? असा जाब विचारला. त्यावरून दोघींत बाचाबाची सुरू झाली. शैलाने घरात घुसून दरवाजा आतून बंद केला आणि सोबत आणलेले कुलूप लावले. त्यानंतर तिने साधना यांचे पती महेंद्र सोनपेटकर यांच्याबाबत चौकशी करत वाद घालण्यास सुरुवात केली. साधना आणि शैला यांच्यातील वाद विकोपाला गेला.
वाद वाढताच आरोपीने तिच्या पर्समधून पिस्टल काढून साधनाच्या डोक्याला लावली आणि संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी दिली. केशर बाईंनी धाडस दाखवत तिच्या हाताला झटका देऊन पिस्टल खाली पाडली व उचलून खिडकीतून बाहेर फेकून दिली. मात्र, आरोपीने नंतर पर्समधून रासायनिक स्प्रे काढून साधना आणि केशरबाई यांच्या चेहऱ्यावर फवारला. साधना खाली कोसळल्या, तर केशरबाई यांनाही तीव्र जळजळ होऊ लागली. या संधीचा फायदा घेत आरोपीने धारदार चाकू काढून साधनावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
गळा, पोट, मान, डोके व पाठीवर खोलवर वार करत’ बोल आता बोल’ म्हणत तिने साधनाची हत्या केली. काही क्षणांतच साधना रक्त्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. केशरबाईनी सुनेला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांना धक्का देत खाली पाडले. वयोमानामुळे त्या अधिक प्रतिकार करू शकल्या नाहीत. हत्येनंतर आरोपीने स्वतःलाही किरकोळ जखमी केले आणि बाथरूममध्ये जाऊन हात व चाकू धुतला.
आरोपीने एप्रिल-मे २०२४ मध्ये वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात महेंद्र सोनपेटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. २०११ साली जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करत, लग्नाचे आमिष दाखवून दीर्घकाळ संबंध ठेवले, मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार दिली होती. तसेच पैशांवरून वाद, धमक्या आणि कंपनीत काम करताना ढकलल्याने मशीनमध्ये हात अडकून गंभीर दुखापत झाल्याचाही उल्लेख फिर्यादीत होता. यावरून दोघात तणाव होता.



