पोर्टर डिलिव्हरी अॅप’चा वापर करुन अंमली पदार्थ पुरवठा ; तिघांना अटक

पुणे: अंमली पदार्थ खरेदी केल्यानंतर त्याचा पुरवठा करणार्या शिरुरस्थित आरोपींनी ‘पोर्टर डिलिव्हरी अॅप’चा वापर करुन अंमली पदार्थ पुरवठा केला. ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणार्या तिघांना अटक केली आहे. विशाल मारुती मोरे (वय २०, रा. बाफना मळा, शिरुर), प्रतिक संतोष लंघे (वय २५, रा. करडे, ता. शिरुर), मिथुन विजयपाल सिंग (वय २६, रा़ रामलिंग रोड, सावतामाळी नगर, शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून ४६ ग्रॅम मॅफेड्राॅन, एमडीसह २१ लाख ५२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. न्हावरा फाटा ते बाबुराव नगरकडे जाणार्या रोडवरील शिवसाईलिला मंगल कार्यालया समोर एक कार उभी असून त्यांच्याकडे एमडी हा अंमली पदार्थ आहे, या बातमीची खातरजमा करुन स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीस यांनी कारवाई करुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४७ ग्रॅम एम डी, दोन कार असा २१ लाख ५२ हजार रुपयांचा माल जप्त केला.
अंमली पदार्थांची खरेदी केल्यानंतर पुरवठा करणार्या आरोपींनी पोर्टर या डिलिव्हरी अॅपचा वापर करुन अंमली पदार्थ पुरविला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोर्टरद्वारे अंमली पदार्थांची डिलीव्हरी घेणार्या व्यक्तीकडे तपास पथकाकडून चौकशी सुरु केली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीन, सचिन भोई, नितेश थोरात, अंबादास थोरे यांनी केली.



