पुणे शहर
५० लाख झाडे लावण्याच्या केवळ घोषणा : दत्ता बहिरट

पुणे : महानगरपालिकेचा वृक्षसंवर्धनाबाबतचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या दोन वर्षांत ७,१३२ झाडे तोडण्याची परवानगी देणाऱ्या प्रशासनाने, त्याबदल्यात १७,५३३ झाडे लावल्याचा दावा केला असला, तरी त्यातील किती झाडे प्रत्यक्षात जिवंत आहेत, याची कोणतीही अधिकृत माहिती उद्यान विभागाकडे उपलब्ध नाही.
केवळ कागदोपत्री आकडेवारी मांडणाऱ्या पालिकेकडे झाडांच्या सद्यस्थितीबद्दल कोणतेही उत्तर नसल्याने प्रशासकीय नियोजनाचा अभाव स्पष्ट झाला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पुण्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असताना आणि हरित आच्छादन घटत असताना, ५० लाख झाडे लावण्याच्या केवळ घोषणा न करता प्रशासनाने प्रत्यक्ष कृती आणि पारदर्शकता दाखवणे गरजेचे आहे,अशी अपेक्षा नगरसेवक दत्ता बहिरट यांनी व्यक्त केली.



