पुणे शहर

दीड लाख रुपये घेताना पोलीस हवालदाराला ‘लाचलुचपत’ने पकडले

पुणे : चेक बाऊन्स प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट न बजावण्यासाठी पूर्वीच ५ लाख रुपयांची लाच घेतली असताना पुन्हा नव्याने वॉरंट परत आले असल्याचे सांगून अटक न करण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला सापळा रचून पकडले.

गणेश शहाजी कस्पटे (वय ४०, रा. शंकर सुमन हाईटस, भेकराईनगर, फुरसुंगी) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गणेश कस्पटे याला ताब्यात घेताना त्याने तक्रारदार यांच्या छातीस चावा घेतला आहे. सापळा पथकास धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा आणत पळून जाण्याचा प्रयत्न केला.

तक्रारदार जेथे काम करतात , त्या कंपनी मालकाविरुद्ध हैदराबाद कोर्टामध्ये चेक बाऊन्सची केस चालू होती. त्या केसमध्ये तक्रारदारांचे मालकास नॉन बेलेबल वॉरंट निघालेले होते. त्याची बजावणी न करण्यासाठी गणेश कस्पटे याने यापूर्वी ३ मार्च रोजी तक्रारदारांच्या मालकाकडून ५ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन ते पैसे स्वीकारलेले होते. पुन्हा १ मे कस्पटे याने हे वॉरंट परत आले असल्याचे सांगून तक्रारदार यांच्या मालकांकडे अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाचेची मागणी केली.

परंतु मालक आजारी असल्याने तक्रारदार कस्पटे याला भेटले. त्याने तक्रारदाराच्या मालकांच्या नावे असलेल्या हैदराबाद कोर्टाचे नॉन बेलेबल वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी स्वत:साठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार ५ मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी ५ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करुन २ लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती दीड लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बोट क्लब रोडवरील पानटपरीजवळ सापळा रचला. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून दीड लाख रुपये लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस दलातील खंडणीखोर पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली होती. त्या अगोदर आदल्या दिवशी सोमवारी लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार व पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांना निलंबित केले होते. त्यानंतर आता हा तिसरा प्रकार समोर आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व सहकारी यांनी केली आहे़ सहाय्यक पोलीस आयुक्त भारती मोरे तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page