पुणे शहर

पुण्यात दररोज एक बलात्कार, कोयता गँग, ड्रग्जचा विळखा, गुंडगिरी वाढली

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 

पुणे : ‘नव पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस’, असे पोस्टर्स व बॅनर्स पुणे शहरात जागोजागी झळकवण्यात आले त्याच पुणे शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात लैंगिक शोषणाची ७०० प्रकरणे घडली आहेत, दररोज एक बलात्कार होत आहे. ड्रग्जचा खुलेआम धंदा सुरु आहे. कोयता गँगचा हैदास सुरु आहे, गुलटेकडी मार्केट यार्डात गुंडांचा हस्तक्षेप वाढला आहे, याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत का? असा संतप्त प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला.

पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या संकल्पनेतून संविधान चौक, वानवडी येथे उभारलेल्या ४५ मीटर ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा तसेच काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित राहून कॉंग्रेस पक्ष व तिरंगा राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी कॉंग्रेस पक्षाने दिलेले योगदान तसेच इतर विषयांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पुणे कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, खजिनदार अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरूवात नसरापूर, पुणे येथील ४ वर्षीय पीडित बालिका आणि महिला व बाल अत्याचारातील अन्य पीडितांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जगात आज एपस्टिन फाईलने धुमाकुळ घातला आहे. लहान व कोवळ्या वयातील मुला मुलींचे लैंगिक शोषण करुन, त्यांच्या हत्या करण्यात आल्याचे यातून उघड झाले आहे. विकृतीचा अत्यंत घाणेरडा व किळसवाणा हा प्रकार असून यामुळे जगात भूकंप आला आहे. जगभरातील अनेक मोठ्या पदावरील व्यक्तींनी राजीनामे दिले आहेत. याच एपस्टिन फाईलमध्ये भारतातील दोघांची नावे आहेत, एक आहेत केंद्रीय मंत्री हरदिप पुरी तर दुसरे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. नरेंद्र मोदी इस्त्रायलमध्ये जाऊन नाचले अशी माहिती समोर आली आहे. ही एपस्टिन फाईल उघड झाल्यापासून नरेंद्र मोदी अत्यंत दबावात काम करत आहेत. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी अचानक युद्धबंदीची घोषणा अमेरिकेने केली. अमेरिकेबरोर दबावाखाली व्यापार करार करावा लागला. कच्चे तेल रशियाकडून घ्यायचे नाही, हे अमेरिका भाराताला सांगत आहे आणि नरेंद्र मोदी मात्र काहीही न बोलता गप्प आहेत, कारण नरेंद्र सरेंडर झाले आहेत. एपस्टिन फाईल्ससारखे बाल लैंगिक शोषणाचे प्रकार महाराष्ट्रातही वाढत आहेत, हा काय योगायोग आहे? अशी विचारणा सपकाळ यांनी केली.

आपला राष्ट्रीय ध्वज तिरंग्यासाठी हजारो लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या पण तिरंग्याचा अपमान होऊ दिला नाही. या तिरंग्यातील भगवा रंग हा त्यागाचे प्रतिक आहे. पांढरा रंग प्रकाश व सत्याचे प्रतिक आहे, तर हिरवा रंग हा सुजलाम सुफलाम म्हणून घेतला आहे तर अशोक चक्र हे गतीमानतेचा प्रतिक आहे. या तिन्ही रंगाचा कार्यकारणभाव भाजपा व रा. स्व. संघ मोडू पहात आहे. संघाने तिरंग्याला विरोध करत स्वातंत्र्यानंतर जवफवास ५०-५५ वर्षे रा. स्व. संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही, अशा प्रवृत्तीविरोधात उभे ठाकले पाहिजे. आपली लढाई तिरंगा विरोधात काळ्या टोपीची आणि संविधान विरोधात मनुवादाची लढाई आहे असे सपकाळ म्हणाले.

पुण्यात ३४ हजार कोटी रुपयांचे ५४ किलोमिटरचे भूमिगत रस्ते प्रकल्प आखण्यात आला आहे. यात मोठा भ्रष्टाचार आहे. हा प्रकल्प जाहीर करताना कोणतीही जनसुनावणी घेण्यात आलेली नाही, नगरसेवकांना विचारात घेतले नाही. हा प्रकल्प पुण्यात भ्रष्टाचाराची पाळंमुळं रोवणारा आहे, त्याच्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page