दहावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.४० ने अधिक
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.६२ टक्के

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.६२ टक्के लागला आहे.
निकालाची वैशिष्ट्ये
या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उतीर्णतेची टक्केवारी ९२.९ इतकी आहे.
मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक
दहावीची परीक्षा दिलेल्या एकूण ८,२०,४२७ मुलांपैकी ७,३४.८१४ मुले (८९.५६ टक्के) तर एकूण ७,२२,०४५ मुलींपैकी ६,८५,६७२ मुली (९४.९६ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5
५.२० ने अधिक आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.६२ टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ टक्के) आहे. इतर विभागांमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.४७ टक्के, मुंबई- ९४.९७ पुणे- ९४.२४, नाशिक- ९०.५३ अमरावती- ९०.५०, नागपूर-८९.७ तर लातूर विभागाचा निकाल ८८.४२ टक्के लागला आहे.
*श्रेणीनिहाय निकाल*
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण २७.४१ टक्के, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण ३१.२६ टक्के, द्वितीय श्रेणीमध्ये २४.६६ टक्के तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८.७५ टक्के इतके आहे.
श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुनःश्च प्रविष्ट होता येईल. फेब्रुवारी-मार्च २७ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ जून-जुलै २०२७ च्या दहावीच्या परीक्षेस ‘श्रेणीसुधार/ गुणसुधार’ साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.



