नवी दिल्लीलातूर

नाव मोठे, पण कृत्य काळे! ‘RCC’ च्या शिवराज मोटेगावकरचे ‘लातूर पॅटर्न’ की ‘पेपर लीक पॅटर्न’? सीबीआय चौकशीत पर्दाफाश!”  

९ दिवसांची सीबीआय कोठडी 

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन

लातूर/नवी दिल्ली : देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टावर रात्रंदिवस ‘तोटे’ फेरणाऱ्या लातूरच्या ‘RCC’ (आरसीसी) कोचिंग क्लासेसचा सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकर उर्फ ‘एम सर’ याला अखेर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बेड्या ठोकल्या आहेत. सुमारे १२ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सीबीआयने ही मोठी कारवाई केली. आज मोटेगावकरला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात आणि लातूर पॅटर्नच्या विश्वासार्हतेवर प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२३ एप्रिललाच घरात आणि मोबाईलमध्ये पोहोचला पेपर!

सीबीआयने कोर्टात केलेल्या खुलाशानुसार, शिवराज मोटेगावकर याच्या घरी आणि कोचिंग इन्स्टिट्यूटवर टाकलेल्या छाप्यात थेट गुन्ह्याचा मुख्य पुरावाच हाती लागला आहे. ३ मे रोजी होणाऱ्या NEET-UG २०२६ परीक्षेचा केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विषयाचा पेपर परीक्षा होण्याच्या तब्बल १० दिवस आधी, म्हणजेच २३ एप्रिल २०२६ रोजीच मोटेगावकरच्या मोबाईलवर आणि घरात प्रश्नपेढीच्या (Question Bank) स्वरूपात जसाच्या तसा उपलब्ध होता.

निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीसोबत ‘जीवलग’ कनेक्शन!

न्यायालयात न्यायाधीशांनी तपास अधिकारी पवन कौशिक यांना विचारले की, “मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका आहेत हे तुम्हाला कसं कळलं?” त्यावर सीबीआयने सांगितले की, परीक्षा प्रक्रियेशी आणि एनटीएशी (NTA) संबंधित असलेला पुणे/लातूरचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी (ज्याला आधीच अटक झाली आहे) हा शिवराज मोटेगावकरचा जीवलग मित्र आहे. कुलकर्णी हा थेट पेपर लीकचा मुख्य स्त्रोत असून, त्याच्याच माध्यमातून मोटेगावकरकडे हा पेपर आला होता. त्यानंतर ‘आरसीसी’ कोचिंग सेंटरच्या नेटवर्कवरून या लीक प्रश्नपत्रिकांचे विद्यार्थ्यांमध्ये वितरण सुरू होते.

आधी पेपर पुरवला, मग ‘माझेच प्रश्न आले’ म्हणून मिरवला!

तपासादरम्यान मोटेगावकरचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परीक्षा संपल्यानंतर मोटेगावकर आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांना विचारतोय की, “आपल्या मॉक टेस्टच्या बाहेरचा प्रश्न आला होता का?” त्यावर एक विद्यार्थी उघडपणे सांगतोय की, “सर, तुम्ही जे १०१ प्रश्न दिले होते, हुबेहूब तेच प्रश्न परीक्षेत आले!” आधी मित्राकरवी पेपर लीक करून घ्यायचा, तो विद्यार्थ्यांना पुरवायचा आणि नंतर ‘आपलेच प्रश्न आले’ म्हणून क्लासची जाहिरात करायची, असा हा भयंकर आणि सुनियोजित कट सीबीआयने उघडकीस आणला आहे.

पत्रकारांच्या प्रश्नावर मोटेगावकरचा ‘रागीट’ कटाक्ष!

आज कोर्टातून बाहेर पडताना पत्रकारांनी मोटेगावकरला विचारले, “लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य बुडवल्याचा तुम्हाला काही पश्चाताप आहे का?” यावर कसलीही खंत व्यक्त करण्याऐवजी पांढरपेशा गुन्हेगार मोटेगावकरने पत्रकारांकडे अत्यंत रागाने आणि उर्मटपणे बघितले.

या संपूर्ण घोटाळ्यात गुरुग्राम ते लातूर कनेक्शन आणि तब्बल १० लाख रुपयांचे व्यवहार समोर आले आहेत. आता सीबीआय कोठडीत पुढील ९ दिवस ‘एम सर’ची कसून चौकशी होणार असून, ‘आरसीसी’चे इतर कोणकोणते भागीदार आणि एजंट यात सामील आहेत, याचे धागेदोरे बाहेर येणे बाकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page