ओडिसामध्ये थरार! भररस्त्यात तरुणावर बांबूने जीवघेणा हल्ला; मैत्रिणीने अंगावर पडून वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल!

बेरहामपूर (ओडिसा) : ओडिसातील गंजाम जिल्ह्यातील बेरहामपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वैमनस्यातून काही गुंडांनी भररस्त्यात एका तरुणावर बांबूच्या काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. या अत्यंत थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये मित्राचे प्राण वाचवण्यासाठी एका तरुणीने दाखवलेले अदम्य धाडस पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आणि त्याची मैत्रीण दुचाकीवरून जात असताना हल्लेखोरांनी त्यांना गाठले. काही समजण्याच्या आतच दोन व्यक्तींनी तरुणाला दुचाकीवरून पाडले आणि त्याच्यावर बांबूच्या काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुण जमिनीवर कोसळल्यानंतरही हल्लेखोर त्याच्यावर सपासप वार करत होते.
जीवाची पर्वा न करता तरुणी बनली ‘ढाल’
हल्ला इतका भीषण होता की तरुणाचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, अशा कठीण प्रसंगी त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट मित्राच्या अंगावर झोकून दिले. हल्लेखोर काठ्या मारत असताना ती ढाल बनून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली. तरुणी मध्यभागी आल्याने हल्लेखोरांना थेट वार करता आले नाहीत आणि यामुळे तरुणाचे प्राण वाचले. या मारहाणीत दोघेही जखमी झाले असून त्यांना तातडीने स्थानिक एमकेसीजी (MKCG) वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
जुन्या वैमनस्यातून हल्ला; पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत. प्राथमिक तपासानुसार, पीडित तरुण आणि हल्लेखोर हे पूर्वी एकाच गटामध्ये एकत्र काम करत होते. मात्र, त्यांच्यात काही अंतर्गत मतभेद आणि जुने वाद होते, ज्यातून हा हल्ला झाला. पीडित तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटली असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेने पुन्हा एकदा शहरातील गुंडगिरी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.



