मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात खाकीची अब्रू डिझेलमध्ये वाहून गेली? बेपत्ता मुलीच्या शोधाला इंधनाचाच तोटा!”

विशेष प्रतिनिधी, नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. नागपूरमधील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडली. मात्र, हवालदील झालेल्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले असता, “आमच्या गाडीत डिझेल नाही, त्यामुळे शोधासाठी जाता येत नाही,” असे धक्कादायक उत्तर ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी दिले. या संवेदनशील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण नागपुरात आणि राजकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पाचपावली परिसरातून एक तरुणी अचानक बेपत्ता झाली. मुलीच्या जीवाला धोका असू शकतो या भीतीने कुटुंबीयांनी तत्काळ पाचपावली पोलीस ठाण्यात धाव घेतली. अशा वेळी पोलिसांनी तात्परतेने पावले उचलणे अपेक्षित असताना, त्यांनी केवळ वाहनात इंधन नसल्याचे तांत्रिक कारण पुढे केले नाही, तर “मुलगी २१ वर्षांची आहे, ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते, तिला जिथे जायचे असेल तिथे जाऊ शकते,” असे बेजबाबदार वक्तव्य करून प्रकरणाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. अखेर संतापलेल्या नागरिकांनी “आमच्याकडून पैसे घ्या, पण मुलीला शोधा” असे सुनावल्यानंतर पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. सुदैवाने, पोलिसांनी नंतर तपास चक्रे फिरवून मुलीला सुखरूप शोधून काढले आहे, ती एका मित्रासोबत गेल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
वरिष्ठांकडून अंतर्गत चौकशी सुरू; दोषींवर कारवाईची टांगती तलवार!
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूर पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पाचपावली पोलीस ठाण्यातील संबंधित बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सध्या प्राथमिक तपासाचे काम सुरू असल्याने त्या संबंधित दोषी अधिकाऱ्याचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, कर्तव्यात कसूर करणे आणि नागरिकांशी उद्धट वर्तन केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कडक खात्यांतर्गत कारवाई किंवा निलंबनाची (Suspension) मोठी टांगती तलवार असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
“हा अमृतकाल नाही, व्यवस्थेचे अपयश!” – विरोधक आक्रमक
या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. “मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या शहरात पोलिसांकडे बेपत्ता मुलगी शोधायला डिझेल नसावे, यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते? सत्ताधाऱ्यांच्या इव्हेंट, सेल्फी आणि पीआरसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध असतो, मग जनतेच्या सुरक्षेसाठी पैसे का नाहीत? हा अमृतकाल नसून संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचा काळ आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
मुलगी सुखरूप परत आली असली, तरी या घटनेने पाचपावली पोलिसांच्या बेजबाबदार कारभाराचे वाभाडे काढले आहेत. जर राज्याच्या उपराजधानीत आणि व्हीआयपी जिल्ह्यात पोलिसांकडे पेट्रोल-डिझेलसाठी पैसे नसतील, तर ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांची काय अवस्था असेल? अशा परिस्थितीत राज्यातील महिला आणि मुली कशा सुरक्षित राहणार, असा गंभीर प्रश्न आता महाराष्ट्रातील सामान्य जनता विचारत आहे.



