पुणे शहर

पुणे शहरात २६ मे पासून १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू; पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उप-आयुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश दिनांक २६ मे २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजेपासून ते दिनांक ८ जून २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत (एकूण १४ दिवस) लागू राहतील.

पुणे शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून होणारे मोर्चे, धरणे, निदर्शने, तसेच अतिक्रमण हटाव मोहिमांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातच आगामी काळात होणारी बकरी ईद आणि इतर सण-उत्सवांच्या अनुषंगाने शहरात शांतता टिकवून ठेवण्यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

आदेशानुसार, निश्चित केलेल्या १४ दिवसांच्या कालावधीत

तलवार, भाले, बंदुका, सोटे, काठ्या, दगड किंवा शारीरिक इजा करू शकेल अशी कोणतीही वस्तू जमा करणे, तयार करणे किंवा सोबत बाळगण्यास मनाई आहे. कोणताही दाहक, स्फोटक किंवा ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यास बंदी असेल. कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिमेचे, पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रदर्शन किंवा प्रतीकात्मक प्रेताचे दहन करण्यास मनाई आहे.

मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनिक टीका करणे, आणि सार्वजनिक नैतिकता किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात आणणारी आवेशपूर्ण भाषणे व कृत्य करण्यावर बंदी आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय ५ किंवा ५ पेक्षा जास्त लोकांचा जमाव करून सभा घेणे किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींना, ज्यांना कर्तव्यासाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाही. तसेच ३.५ फुटांपर्यंत लाठी बाळगणारे खाजगी सुरक्षा रक्षक, गुरखा किंवा चौकीदार यांना यातून वगळण्यात आले आहे.

या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कडक कायदेशीर कारवाई व शिक्षा केली जाईल, असा इशारा पोलीस उप-आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिला आहे. सर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हा आदेश सार्वजनिक ठिकाणी लावून ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page