लेख: तुमच्या-आमच्या जिवावर उठलेला ‘नीट’चा महाघोटाळा: यंत्रणांची घोर झोप, पैशांची हुकूमशाही आणि उद्याचे ‘लायसन्सधारी’ मारेकरी!

लेख: तुमच्या-आमच्या जिवावर उठलेला ‘नीट’चा महाघोटाळा: यंत्रणांची घोर झोप, पैशांची हुकूमशाही आणि उद्याचे ‘लायसन्सधारी’ मारेकरी!
लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने, गरिबांच्या पालकांनी आयुष्यभराची पुंजी विकून आणि कर्ज काढून उभी केलेली पै-पै अन् रात्रीचा दिवस करून घेतलेली प्रामाणिक मेहनत… या सगळ्याचा लिलाव देशातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) परीक्षेत अत्यंत निर्लज्जपणे आणि अमानुषपणे करण्यात आला.
देशात आणि महाराष्ट्रात सध्या सीबीआयचे छापे सुरू आहेत, डझनभर प्राध्यापक, दलाल, कोचिंग क्लासेसचे चालक आणि ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांना अटक करण्यात आली आहे. रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि रोज नवा गुन्हा दाखल होत आहे. पण हा केवळ एका परीक्षेचा किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा घोटाळा नाही; हा थेट मानवजातीच्या आरोग्याशी चाललेला जीवघेणा खेळ, गुणवत्तेचा नरसंहार आणि देशाच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला लागलेला कॅन्सर आहे!
हा प्रकार यावर्षी उघडकीस आला म्हणून ठीक, पण या टोळीने मागील कित्येक वर्षांपासून हाच धंदा मांडला असणार, यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. विचार करा, मागील परीक्षांमध्ये कोट्यवधी रुपये फेकून, प्रश्नपत्रिका विकत घेऊन जे ‘बोगस’ विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये घुसले; ते आज-उद्या डॉक्टर म्हणून पांढरा कोट घालून बाहेर पडतील. पैशांच्या जोरावर डॉक्टर बनलेले हे ‘दलाल’ उद्या तुमच्या-आमच्या आणि आपल्या मुलाबाळांच्या जिवाशी खेळणार नाहीत याची काय गॅरंटी?
या संपूर्ण प्रकरणाचा सीबीआय तपास पाहिला तर अंगावर काटा येतो. ज्यांच्यावर देशाच्या भावी डॉक्टरांना पारखून घेण्याची, त्यांची परीक्षा घेण्याची सर्वोच्च जबाबदारी होती, त्यांनीच विंचवाचे पाऊल टाकले. ‘एनटीए’च्या (NTA) आत बसलेले अधिकारी आणि तज्ज्ञच या महापापाचे मुख्य भागीदार आणि सूत्रधार निघाले.
पी. व्ही. कुलकर्णी: लातूरमधील दयानंद महाविद्यालयाचे हे निवृत्त प्राध्यापक थेट एनटीएच्या गोपनीय परीक्षा प्रक्रियेत आणि प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या कामात सामील होते. त्यांनी रसायनशास्त्र विभागाचे प्रश्न आधीच लीक केले. त्यानंतर पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी काही निवडक विद्यार्थ्यांना जमवून गुपचूप स्पेशल क्लासेस घेतले आणि थेट प्रश्न व त्यांची उत्तरे लिहून दिली.
मनीषा मांढरे: पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या या प्राध्यापिकेकडे एनटीएने प्रादेशिक भाषांमधील प्रश्नपत्रिकेच्या भाषांतरासाठी (अनुवाद) तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. या प्रक्रियेदरम्यान त्यांना बॉटनी (Botany) आणि झूलॉजीच्या (Zoology) प्रश्नपत्रिकांचे पूर्ण ॲक्सेस मिळाले. त्यांनी पैशांच्या मोबदल्यात हे प्रश्न इतर सह-आरोपी व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
मनीषा हवालदार: पुण्यातील बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत भौतिकशास्त्राच्या शिक्षिका असलेल्या हवालदार यासुद्धा एनटीए पॅनेलवर भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक करून ते मुख्य सूत्रधार मनीषा मांढरे यांच्याकडे सोपवले होते, ज्यावरून हस्तलिखित नोट्स तयार करण्यात आल्या.
जेव्हा या व्यक्ती इतक्या संवेदनशील आणि अति-गोपनीय पदांवर काम करत होत्या, तेव्हा त्यांच्यावर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची (Intelligence Agencies) गोपनीय पाळत का नव्हती? त्यांचे फोन कॉल्स, त्यांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे हे कोणाचे काम होते? की यंत्रणा फक्त राजकीय विरोधकांच्या मागे लावण्यापुरत्याच शिल्लक राहिल्या आहेत? की सामान्य जनतेच्या जिवापेक्षा यंत्रणांना इतर गोष्टी महत्त्वाच्या वाटतात?
“तहान लागल्यावर विहीर खणणे आणि घर जळाल्यावर अग्निशामक दलाला बोलवणे” यात आणि आपल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभारात काहीच फरक उरलेला नाही.
लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचा संस्थापक शिवराज मोटेगावकर हा या नियोजनाचा मुख्य दुवा होता. सीबीआयच्या प्राथमिक संशयानुसार, मोटेगावकर यांनीच आर्थिक फायद्यासाठी प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांना एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर आणण्यासाठी मध्यस्थी केली होती. तर पुण्यातील सुखसागर नगरमध्ये ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे ही या रॅकेटची आर्थिक व जमिनीवरील मुख्य व्यवस्थापक होती; जिने पैशांची खोकी मोजायला तयार असणारे श्रीमंत पालक आणि परीक्षार्थी शोधून त्यांना मुख्य प्राध्यापकांच्या गुप्त क्लासेसपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. नाशिकमधील परीक्षा समुपदेशक (counselling operator) शुभम मधुकर खरणार आणि अहमदनगरचा पेपर मध्यस्थ धनंजय निवृत्ती लोखंडे यांनी या जाळ्याचा विस्तार राज्यभर केला. पुण्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्यावर तर स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे!
जेव्हा हे माफिया कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत होते, तेव्हा यंत्रणांना याचा सुगावाही लागला नाही. आज ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करून २१ जून रोजी पुनर्परीक्षा जाहीर करून एनटीएने आपले हात वर केले आहेत. पण पेपर फुटण्याच्या आधी कोणती ‘खबरदारी’ घेण्यात आली होती? दरवर्षी प्रत्येक मोठ्या परीक्षेच्या वेळी पेपर फुटण्याचा हा भयानक प्रकार सातत्याने समोर येत असताना केंद्रीय यंत्रणा मात्र झोपा काढत असते का?
जर एखाद्या विद्यार्थ्याला ‘भौतिकशास्त्र’, ‘रसायनशास्त्र’ आणि ‘जीवशास्त्र’ या विषयांचे मूलभूत ज्ञानच नसेल, आणि त्याने केवळ ५० लाख ते १ कोटी रुपये मोजून परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले असतील, तर तो कॉलेजमध्ये जाऊन काय शिकणार?
ज्यांची पात्रता शून्य आहे, ते जेव्हा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून शस्त्रक्रियागृहात (Operation Theater) हातात सुरी धरतील, तेव्हा ते रुग्णाचा जीव वाचवतील की त्याचा बळी घेतील? भविष्यात होणाऱ्या चुकीच्या उपचारांना, चुकीच्या औषधोपचारांना, चुकीच्या निदानांना आणि त्यामुळे जाणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या जिवाला जबाबदार कोण असणार? या नराधमांनी केवळ पेपर फोडला नाही, तर समाजाच्या आरोग्याचा पोतच सडवून टाकला आहे. उद्या आपल्या घरातील आजारी माणसाला वाचवणारा डॉक्टर हा ‘दवाखान्याचा डॉक्टर’ नसून ‘दलालांच्या टोळीचा’ सदस्य असू शकतो, ही भीतीच सर्वसामान्यांचा थरकाप उडवणारी आहे. हा थेट समाजाच्या आरोग्याशी खेळणारा एक अदृश्य दहशतवादच आहे!
या घोटाळ्याने देशातील सामाजिक न्यायाचा, राज्यघटनेने दिलेल्या समानतेच्या अधिकाराचा आणि आरक्षणाचा पायाच हादरवून सोडला आहे. रात्रीचा दिवस करून, कंदिलाच्या किंवा रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात, गरिबीशी, उपाशीपोटी झगडत अभ्यास करणाऱ्या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या मुलाने ७२० पैकी ६५० गुण मिळवूनही तो प्रवेशापासून वंचित राहतो. दुसरीकडे, एका ब्युटी पार्लर चालवण्याच्या किंवा क्लास चालवणाऱ्या सम्राटांच्या संपर्कात येऊन, एका रात्रीत ७२० पैकी ७२० गुण मिळवून श्रीमंतांची सुमार बुद्धीची पोरे देशातील सर्वोच्च मेडिकल कॉलेज काबीज करतात.
हा सरळ-सरळ गुणवत्तेचा खून आहे. ही नवी आर्थिक हुकूमशाही आहे, जिथे ‘बुद्धी’ गहाण पडली आहे आणि ‘पैसा’ गुणवत्तेची व्याख्या ठरवत आहे. जर गरिबांच्या मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळणार नसेल, तर या देशातील लोकशाही जिवंत कशी राहणार? शिक्षण हाच जर श्रीमंतांची जहागीर बनणार असेल, तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे?
आज कोचिंग क्लासेस हे शिक्षणाचे मंदिर राहिलेले नसून ते ‘मानवी कॉर्पोरेट कत्तलखाने’ झाले आहेत. पालकांच्या मनात ‘माझा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनिअरच झाला पाहिजे’ ही जी विकृत सामाजिक प्रतिष्ठा पेरली गेली आहे, त्याचा फायदा हे माफिया घेतात. या आत्मघातकी स्पर्धेमुळे मुलांवर एवढा मानसिक ताण येतो की, अपयशाच्या भीतीने, सिस्टीमच्या नाकर्तेपणामुळे ते थेट मृत्यूला कवटाळत आहेत. आज कित्येक निष्पाप विद्यार्थ्यांनी ताणतणावामुळे आपले जीवन संपवले आहे; या ‘संस्थात्मक खुनां’चा (Institutional Murder) जबाबदार कोण?
याहून भयंकर म्हणजे, जो विद्यार्थी कोट्यवधीची लाच देऊन डॉक्टर बनणार, तो पुढे जाऊन प्रामाणिक डॉक्टर कसा बनेल? तो डॉक्टर कधीच ‘रुग्णसेवा’ करणार नाही. तो रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला केवळ ‘बकरा’ म्हणून बघून आपला दिलेला खर्च व्याजसहित वसूल करण्याचा प्रयत्न करेल. विनाकारण लॅब टेस्ट लिहून देणे, महागडी औषधे सुचवणे, बोगस ऑपरेशन्स करणे आणि कमिशनखोरीचे भयानक गुन्हे याच ‘बोगस’ मानसिकतेतून जन्माला येतात.
या पेपरफुटीने आपल्या समाजाचा नैतिक चेहराही उघडा पाडला आहे. ज्या पालकांनी आपल्या मुलांसाठी पेपर विकत घेतले, ते डॉक्टर, व्यावसायिक आणि सुशिक्षित समाजातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. जेव्हा आई-वडीलच आपल्या मुलाला यशाचा शॉर्टकट म्हणून ‘गुन्हेगारीचा’ रस्ता दाखवतात, तेव्हा त्या देशाची नैतिक वीण पूर्णपणे उसवून जाते.
आपण असे कसे नागरिक घडवत आहोत जे पहिल्याच पावलावर भ्रष्टाचाराचे दूध पिऊन मोठे होत आहेत? जर देशातील तरुण पिढीचा न्यायव्यवस्थेवर, परीक्षा पद्धतीवर आणि सरकारवरचा विश्वास उडाला, तर देशात अराजकता माजायला वेळ लागणार नाही. आजचा तरुण अत्यंत हताश आणि संतप्त आहे. त्याच्या या संतापाचा स्फोट झाला, तर तो सांभाळणे कोणत्याही सरकारला शक्य होणार नाही.
हा लढा फक्त परीक्षा रद्द करण्याचा किंवा २१ जूनला पुनर्परीक्षा घेण्याचा नाही. हा लढा या देशातील प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि सर्वसामान्य माणसाचा जगण्याचा अधिकार जिवंत ठेवण्याचा आहे. केंद्रीय यंत्रणांनी आता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याचे आणि छापे टाकल्याचे फुशारकी मारणारे क्रेडिट घेणे बंद करावे. आधी देशातील जनतेला हे सांगावे की तुमच्या नाकाखाली एवढा मोठा दरोडा पडत असताना तुम्ही डोळ्यांवर कातडे ओढून आणि कानात कापूस कोंबून का बसला होता?
‘महाराष्ट्र मिशन’ आज स्पष्ट शब्दांत इशारा देत आहे: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे हे पाप, त्यांच्या पालकांच्या डोळ्यांतील अश्रू आणि त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या भविष्याचा तळतळाट या भ्रष्ट यंत्रणेला आणि सरकारला कधीच माफ करणार नाही. आता केवळ अटकेचे नाटक आणि चौकशीचे फार्स नकोत; तर शिक्षण क्षेत्रातील या संपूर्ण कॅन्सरवर तातडीने आणि अत्यंत कठोरपणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ करावाच लागेल. या गुन्हेगारांना आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या राजकीय वरदहस्तांना फासावर लटकवा, अन्यथा हा देशातील तरुण रस्त्यावर उतरून क्रांती केल्याशिवाय राहणार नाही!
जागे व्हा… कारण उद्या तुमच्या कुटुंबाचा जीव घेणारा डॉक्टर याच बोगस कारखान्यातून बाहेर पडलेला असू शकतो!
‘महाराष्ट्र मिशन’चे यंत्रणेला आणि सरकारला थेट, रोकडे आणि झोंबणारे सवाल
❓ सवाल १: याआधी किती ‘मारेकरी’ सिस्टीमने बाजारात सोडले?
मागील ५ वर्षांतील संशयास्पद निकालांची ‘फॉरेन्सिक’ चौकशी करण्याची हिंमत सरकार का दाखवत नाही? ज्या पोरांना १०वी आणि १२वीत साधे पास व्हायची भ्रांत होती, त्यांना ‘नीट’मध्ये अचानक पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले? हा चमत्कार होता की कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार? मागच्या ५ वर्षांत असे किती बोगस डॉक्टर बनवून तुम्ही थेट सर्वसामान्यांच्या छाताडावर बसवले आहेत, याचा हिशोब द्या! या संशयास्पद निकालांची पुनर्तपासणी का होऊ नये? सरकार कोणाला पाठीशी घालत आहे?
❓ सवाल २: बोगस डॉक्टरांचे आणि ‘नराधम’ प्राध्यापकांचे परवाने कायमचे कधी रद्द होणार?
पैशांच्या ढिगाऱ्यावर बसून पदव्या मिळवणारे हे बोगस विद्यार्थी आणि त्यांना मदत करणारे हे देशाचे गद्दार प्राध्यापक; यांच्यावर केवळ ‘तात्पुरत्या’ निलंबनाची मलमपट्टी का? अशा बोगस डॉक्टरांचे आणि दलाल प्राध्यापकांचे परवाने (Licenses) कायमचे रद्द करून, त्यांच्या कपाळावर ‘गुन्हेगार’ असा शिक्का मारणारी कडक नियमावली अजून का बनवली जात नाही? की पुढील निवडणुकीच्या फंडासाठी या माफियांचे परवाने वाचवले जात आहेत?
❓ सवाल ३: ‘एनटीए’च्या (NTA) पांढरपेशा गुन्हेगारांना अजून जेलची हवा का नाही?
‘एनटीए’ (NTA) ही स्वायत्त संस्था नसून देशातील सर्वात मोठी ‘गळकी आणि कुचकामी’ यंत्रणा झाली आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धुळीस मिळवणाऱ्या एनटीएच्या प्रमुखांना आणि एसी केबिनमध्ये बसून मलिदा खाणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना अजूनही बेड्या ठोकून जेलमध्ये का डांबले नाही? देशातील गरिबांच्या पोरांना कायद्याचा धाक दाखवणारे सरकार, या पांढरपेशा सरकारी गुन्हेगारांसमोर लोटांगण का घालत आहे?
❓ सवाल ४: आधी ‘झोपा’ काढायच्या आणि नंतर
‘छापेमारीचे’ नाटक करायचे, हा कुठला न्याय?
पेपर फुटण्याच्या आधी तुमच्या गुप्तचर यंत्रणा (Intelligence Agencies) काय भांग पिऊन झोपल्या होत्या का? विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर, लाखो स्वप्नांची राखरांगोळी झाल्यावर राज्यभर छापे टाकून काय तीर मारत आहात? हा निव्वळ जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी चाललेला ‘स्टंट’ आहे. पेपर फुटण्याआधी प्रतिबंधात्मक कारवाई का झाली नाही? यंत्रणा फक्त राजकीय विरोधकांचे फोन टॅप करण्यासाठीच शिल्लक राहिल्या आहेत का?
❓ सवाल ५: निष्पाप विद्यार्थ्यांच्या ‘संस्थात्मक खुनांची’ जबाबदारी घेऊन कोण राजीनामा देणार?
हा ताणतणाव सहन न झाल्यामुळे, सिस्टीमच्या या नपुंसक कारभारामुळे ज्या शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, ते केवळ मृत्यू नाहीत… ते या भ्रष्ट सिस्टीमने केलेले ‘संस्थात्मक खून’ आहेत! या मृत्यूंची जबाबदारी स्वीकारून देशाचे शिक्षणमंत्री आणि एनटीएचे प्रमुख अजूनही पदावर लाळ घोटत का बसले आहेत? ते राजीनामा कधी देणार? की सर्वसामान्यांच्या मुलांच्या जिवाची किंमत तुमच्या लेखी काहीच नाही?

