NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या अवैध साम्राज्यावर ‘हातोडा’; बीडमधील चार मजली बांधकामावर कारवाई!

बीड / प्रतिनिधी : देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या आणि २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपींवर आता कायद्याचा बडगा अधिक तीव्र झाला आहे. सीबीआयने या घोटाळ्याचा मास्टरमाईंड आणि सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी याला अटक केल्यानंतर, आता बीड नगरपालिका प्रशासनाने त्याच्या अवैध साम्राज्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. बीड शहरातील शाहू नगर भागात सुरू असलेल्या कुलकर्णीच्या चार मजली अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा मारण्यात आला आहे.
सीबीआयच्या अटकेनंतर पालिकेचा ॲक्शन मोड
नीट पेपरफुटीप्रकरणात सीबीआयने (CBI) महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर आणि बीडमधून अनेकांना अटक केली आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे बीडशी जोडले गेल्यानंतर, मुख्य सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णी याचे शहरातील शाहू नगर भागात एक मोठे चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे समोर आले होते. हे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर आणि अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला हे बांधकाम स्वतःहून पाडून घेण्याची नोटीस बजावली होती.
नोटीसचा अल्टिमेटम संपला; स्वतःहून पाडले बांधकाम
प्रशासनाने दिलेल्या नोटीसची मुदत संपल्यानंतरही बांधकाम न हटवल्यास पालिका कारवाई करणार होती. मात्र, आज या नोटीसचा अल्टिमेटम संपताच प्रशासनाचा संभाव्य बडगा आणि फौजदारी कारवाई टाळण्यासाठी संबंधित ठेकेदाराने स्वतःहून हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. सध्या घटनास्थळी हे बांधकाम तोडण्याचे काम वेगाने सुरू आहे.
२२ लाख विद्यार्थ्यांच्या रोषानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या या पेपरफुटी घोटाळ्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. सीबीआयच्या चौकशीत रोज नवनवे खुलासे होत असतानाच, दुसरीकडे आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर प्रशासनाने सुरू केलेल्या या ‘तोडक-मोडक’ कारवाईमुळे बीड शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील काही आरोपींना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, सीबीआयकडून अन्य आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.



