पुणे शहर

पुण्यात ‘रॉन्ग साईड’ने घेतला दोघांचा बळी! खराडीत भीषण अपघात; ३ वर्षांच्या चिमुकल्यासह तरुणाचा मृत्यू, थरारक सीसीटीव्ही आले समोर!

पुणे (विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन) :पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघाताची घटना ताजी असतानाच, आता खराडी परिसरातून आणखी एक थरारक आणि अंगावर काटा आणणारा अपघात समोर आला आहे. वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवत विरुद्ध दिशेने (Wrong Side) येणाऱ्या एका भरधाव एसयूव्ही (SUV) कारने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणासह अवघ्या ३ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर चिमुकल्याची आई गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात ३१ मे रोजी रात्री १०:३० च्या सुमारास खराडी येथील समर्थ नगर भागात घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, ते अत्यंत थरारक आहे.

चिमुकल्यासह तरुण ठार, आई गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, पवन पांडुरंग भारंबे (वय ३५, रा. साई सत्यम पार्क, वाघोली) हे त्यांच्या दुचाकीवरून नातेवाईक प्रिया तुषार कोल्हे (वय ३२) आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा दीपराज तुषार कोल्हे यांच्यासह जात होते. समर्थ नगर भागात आले असता, समोरून विरुद्ध दिशेने अत्यंत वेगाने आलेल्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पवन भारंबे यांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ वर्षांचा चिमुकला दीपराज याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रिया कोल्हे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुरावे नष्ट करण्याचा आरोपीचा प्रयत्न; वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला बेड्या!

अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने चक्रे फिरवून आरोपी चालक प्रसाद शिवाजी मोरे (वय २५, रा. रायसोनी कॉलेजजवळ, वाघोली) याला अटक केली. या प्रकरणी पोलीस काँस्टेबल अमोल जाधव यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद (तक्रार) दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी प्रसाद मोरे याच्याकडे वाहन चालवण्याचा कोणताही वैध परवाना (Driving License) नव्हता. अपघातानंतर कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी त्याने कारच्या पुढील आणि मागील दोन्ही नंबर प्लेट्स काढून पुरावे नष्ट करण्याचा निर्लज्ज प्रयत्न केला होता. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा हा डाव उधळून लावत त्याला जेरबंद केले.

५ जूनपर्यंत पोलीस कोठडी, कडक कारवाईचे संकेत

खराडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे करत आहेत.

पुणेकरांमधून तीव्र संताप

आयटी हब असलेल्या खराडी, वाघोली आणि नगर रस्ता परिसरात ‘रॉन्ग साईड’ वाहन चालवणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशा मुजोर चालकांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाहतूक पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाई न करता अशा चालकांवर थेट गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page