धोंडे जेवण की धिंडवडे? राजकीय कार्यक्रमात संस्कृतीचा खेळखंडोबा! नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कार्यक्रमात अश्लील डान्सचा भडीमार!

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील ‘कै. बाळाजी पाटील पवार मंगल कार्यालयात’ ५ जून २०२६ रोजी एका अत्यंत विचित्र आणि संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने आयोजित ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमात चक्क ऑर्केस्ट्रा आणि डान्सचा कार्यक्रम रंगला.
विशेष म्हणजे, हे प्रवीण पाटील चिखलीकर नांदेडचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार/आमदार प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र आहेत. ज्या राजकीय परंपरेचा वारसा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जपला, त्याच राजकीय प्रतिष्ठेच्या सावलीखाली आयोजित या कार्यक्रमात अशा प्रकारचा ‘तमाशा’ झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या कार्यक्रमात स्टेजवर एका तरुणीला ‘जाओ चाहे दिल्ली मुंबई आगरा’ या बॉलिवूड गाण्यावर नाचवण्यात आले. मागे बॅनरवर नेत्यांचे फोटो आणि समोर स्टेजवर अश्लील ठुमके, असा प्रकार पाहून उपस्थित लोकही चक्रावून गेले. ‘धोंडे जेवण’ हा एक कौटुंबिक आणि सांस्कृतिक सोहळा असताना, त्याचे रूपांतर अशा पद्धतीने ‘डान्स बार’मध्ये केल्यामुळे राजकीय संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत.
एकीकडे ज्येष्ठ नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांची राजकीय कारकीर्द आणि दुसरीकडे पुत्राच्या कार्यक्रमात झालेला हा प्रकार, यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आता स्वतः प्रवीण पाटील चिखलीकर यावर काय स्पष्टीकरण देतात आणि ज्येष्ठ नेते प्रतापराव पाटील या प्रकाराची दखल घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



