पुणे शहर

फुरसुंगी परिसरात हवेत गोळीबार करणाऱ्या दोघांना बेड्या; गावठी पिस्टलसह आरोपी गजाआड

फुरसुंगी (पुणे) : सोशल मीडियावर गोळीबाराचा सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत फुरसुंगी पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन तरुणांना गावठी पिस्टल आणि मॅगझीनसह जेरबंद केले आहे.

आदेश आत्माराम काळे (वय २०, रा. काळेवाडी, ता. पुरंदर) आणि अजय बाळासाहेब साबळे (वय ३०, रा. साबळे मळा, वडकीनाला, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस अंमलदार हेमंत शरदचंद्र कामठे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवत होते. १३ जून रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, वडकीनाला परिसरातील महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या मोकळ्या जागेत काही संशयित इसम शस्त्र घेऊन थांबले आहेत. पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ सापळा रचला आणि पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले.

आरोपी आदेश काळे याच्या झडतीदरम्यान त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल आणि मॅगझीन मिळून आले. चौकशीदरम्यान हे पिस्टल अजय साबळे याचे असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

व्हायरल व्हिडिओमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, फुरसुंगी पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने नागरिकांकडून पोलीस पथकाचे कौतुक होत आहे. या कारवाईत उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे, विनोद पवार आणि त्यांच्या पथकाचा मोलाचा वाटा होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page