सांगली

वेदांत बंडगर हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात; मैत्रिणीसह लॉजवर लपला होता आरोपी

सांगली : प्रतिनिधी

रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्या नातवाची, वेदांत मारुती बंडगर (वय १४) याच्या डोळ्यात गोळी झाडून निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नीलेश विठोबा गडदे (रा. वाघमोडेनगर, कुपवाड, सध्या रा. कुंभारी, ता. जत) असे या अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. हत्येनंतर फरार असलेला गडदे कर्नाटक सीमाभागातील एका लॉजवर आपल्या मैत्रिणीसोबत असताना पोलिसांच्या पथकाने त्याला जेरबंद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरग येथील रेल्वे मालधक्क्याच्या ठेक्यावरून लक्ष्मण खरात यांच्या कुटुंबाला धमकावल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या वादातून सांगलीतील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यादरम्यान गडदे याच्या मोटारीवर दगडफेक झाल्याने संतप्त झालेल्या गडदेने आपल्या चार साथीदारांसह सांगली गाठली. बाळासाहेब बंडगर यांना मारण्याच्या उद्देशाने तो त्यांच्या निवासस्थानी पोहोचला, मात्र तिथे बंडगर नसल्याचे पाहून त्याने रागाच्या भरात दारात खेळत असलेल्या वेदांत बंडगरच्या कॉलरला पकडून थेट त्याच्या उजव्या डोळ्यात गोळी झाडली. या घटनेनंतर आरोपी जीपमधून फरार झाले होते.

या हत्येमुळे सांगलीत मोठा तणाव निर्माण झाला होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पाच विशेष पथके रवाना करण्यात आली होती. दोन दिवस गुंगारा दिल्यानंतर अखेर रविवारी त्याला कर्नाटक सीमाभागातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसून आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गडदेवर यापूर्वीही कुपवाड एमआयडीसी ठाण्यात खुनाचा आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या या प्रकरणातील इतर तीन फरार साथीदार किरण लोखंडे, विशाल चौगुले आणि नानासाहेब चौगुले यांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page