सांगली

सांगलीत यात्रेवर काळाचा घाला; जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू, २० जखमी

जत : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या यात्रेदरम्यान एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी अचानक आलेल्या सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे यात्रेतील एक भिंत भाविकांच्या अंगावर कोसळली. या भीषण दुर्घटनेत ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू होती. यात्रेसाठी परिसरातील शेकडो भाविक जमले होते. मात्र, मंगळवारी दुपारच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक भाविकांनी एका भिंतीचा आसरा घेतला होता. मात्र, वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने ही जुनी भिंत अचानक भाविकांच्या अंगावर कोसळली. भिंत कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पोलीस आणि महसूल विभाग घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page