शिक्षण व्यवस्था आणि बेरोजगारी: ‘कॉकरोच जनता पार्टी’चे देशभरात आंदोलन, प्रकाश राज यांचा पाठिंबा

बंगळुरू : देशातील शिक्षण व्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या ज्वलंत प्रश्नांवरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या नव्या सामाजिक-राजकीय चळवळीने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. केवळ २६ दिवसांत सोशल मीडियावर विक्रमी लोकप्रियता मिळवणाऱ्या या चळवळीने आता रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.
प्रकाश राज आणि सोनम वांगचुक यांचा पाठिंबा
रविवारी बंगळुरूमध्ये झालेल्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या चळवळीला जाहीर पाठिंबा दर्शविला. तत्पूर्वी, हैदराबादमधील आंदोलनात ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तरुणांना मार्गदर्शन केले होते. आंदोलक युवक केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील गोंधळ आणि रोजगाराच्या धोरणांबाबत सरकारवर ही चळवळ जोरदार टीका करत आहे.
९ दिवसांत ५ शहरांत आंदोलनाचा धडाका
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ दिवसांत दिल्ली (जंतर-मंतर), पुणे, लखनौ, अमृतसर आणि बंगळुरू अशा पाच प्रमुख शहरांत आंदोलने झाली आहेत. ६ जून रोजी दिल्लीतून सुरू झालेला हा प्रवास आता २० जून रोजी पुन्हा जंतर-मंतरवर एका मोठ्या सभेने अधिक तीव्र होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
नेमकी सुरुवात कशी झाली?
१५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांविषयी केलेल्या एका टिप्पणीचा निषेध म्हणून या पक्षाचा जन्म झाला. अमेरिकेत वास्तव्यास असलेले अभिजीत दीपके यांनी १६ मे रोजी सोशल मीडियाद्वारे या चळवळीची घोषणा केली. अवघ्या काही दिवसांतच या चळवळीने तरुणांना मोठ्या संख्येने जोडले आहे.
सोशल मीडियावर अफाट प्रभाव
सीजेपीचा सोशल मीडियावरील प्रभाव थक्क करणारा आहे. पक्षाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर तब्बल २.२७ कोटींहून अधिक फॉलोअर्स असल्याचा दावा केला जात आहे, तर एक्स (ट्विटर) वर २.७५ लाख समर्थकांनी या चळवळीला साथ दिली आहे. तसेच, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेवर ८ लाखांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
‘कॉकरोच जनता पार्टी’ ही केवळ इंटरनेटवर मर्यादित राहणार की देशाच्या राजकारणात एक मोठी शक्ती म्हणून पुढे येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



