नवी दिल्ली

तासाला २५० रुपये, पण भविष्यातील नोकऱ्यांचा बळी? डोक्यावर कॅमेरा लावून घरकाम करणाऱ्यांची चर्चा

नवी दिल्ली :सध्या सोशल मीडियावर एका विचित्र पण धक्कादायक ट्रेंडची चर्चा रंगली आहे. अनेक महिला आणि तरुण-तरुणी आपल्या डोक्यावर कॅमेरा लावून रोजची घरची कामे करताना दिसत आहेत. तासाला २५० रुपये मानधनासाठी सुरू असलेल्या या कसरतीमागचे कारण आता समोर आले आहे, जे भविष्यातील नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

काय आहे नेमका प्रकार?

चेन्नईतील २५ वर्षीय नागीरेड्डी श्रीरामचंद्रा यांच्यासह अनेक लोक सध्या ‘एआय डेटा ट्रेनर’ म्हणून काम करत आहेत. स्वयंपाक करणे, भाजी चिरणे किंवा घराची स्वच्छता करणे अशा कामांच्या वेळी त्यांच्या डोक्यावर स्मार्टफोन बांधलेला असतो. हा स्मार्टफोन त्यांच्या प्रत्येक हालचालीचे ‘इगोसेंट्रिक डेटा’ (माणसाच्या नजरेतून दिसणारे दृश्य) टिपतो. हे फुटेज सोशल मीडियासाठी नसून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कंपन्यांसाठी असते. या डेटाचा वापर करून रोबोट्सना मानवी हालचाली आणि कामे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

डिजिटल श्रमबाजाराचे नवे वास्तव

अनेक कंपन्या मानवी कृतींचे हजारो तासांचे फुटेज गोळा करत आहेत. जर कॅमेऱ्यात हात व्यवस्थित दिसत नसेल किंवा कृती चुकीची होत असेल, तर त्यांना उपकरणाद्वारे तत्काळ सूचनाही दिल्या जातात. तासाला २५० रुपये मिळवून देणारा हा ‘डिजिटल श्रमबाजार’ आता भारतात वेगाने पसरत आहे.सोशल मीडियावर खळबळ: ‘स्वतःच्या हाताने नोकरी संपवण्याचा प्रयत्न’

सोशल मीडियावर हा प्रकार ‘स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखा’ असल्याचे मत व्यक्त होत आहे. “लोक अशा तंत्रज्ञानाला बळ देत आहेत, जे भविष्यात त्यांचेच काम हिरावून घेईल,” अशी भीती नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

असंघटित क्षेत्रापुढील मोठे संकट

नीती आयोगाच्या अहवालानुसार, एआयमुळे केवळ ‘व्हाइट-कॉलर’ नोकऱ्याच नाही, तर भारतातील सुमारे ४९ कोटी असंघटित कामगारांवरही मोठा परिणाम होणार आहे. रोबोट्सना मानवी कामे शिकवण्याच्या या प्रक्रियेमुळे भविष्यात कष्टाच्या कामांमधील मानवी हस्तक्षेप कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकीकडे एआय तंत्रज्ञानाची ही प्रगती मोठी वाटत असली, तरी ती रोजगाराच्या दृष्टीने किती घातक ठरेल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page