मंचर: पुणे-नाशिक महामार्गावर थरार; तरुणाने तरुणीला कालव्यात फेकून स्वतःही मारली उडी

मंचर: प्रतिनिधी
पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बायपास परिसरात एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरुणाने तरुणीला महामार्गावरून बळजबरीने ओढत नेत डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात फेकून दिले आणि त्यानंतर स्वतःही पाण्यात उडी मारली. तब्बल १८ तासांच्या शोधमोहिमेनंतर आज (१५ जून) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास तरुणीचा मृतदेह कालव्यात आढळून आला.
मृत तरुणी स्वप्ना पोपट भांगरे (वय २१, सध्या रा. मंचर, मूळ रा. वाघदरी, ता. अकोले) ही निघोटवाडी गावच्या हद्दीत सुरू असलेल्या एका बांधकाम ठिकाणी काम करत होती. कामावरून सुटल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती महामार्गावरून जात असताना रमेश बबन कडाळे (रा. खिल्लारवाडी, ता. जुन्नर) याने तिला अडवले. आरोपीने तिला बळजबरीने ओढत नेऊन पुलावरून कालव्याच्या पाण्यात फेकून दिले. यानंतर स्वतःही पाण्यात उडी घेतली.
या मार्गावरून जाणाऱ्या निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट यांनी हा धक्कादायक प्रकार पाहिला. त्यांनी त्वरित इतरांना पाचारण केले. काही धाडसी तरुणांनी कालव्याच्या पाण्यात उतरून रमेश कडाळे याला बाहेर काढले. यावेळी त्याने बचाव करणाऱ्या तरुणांवर दगडफेकही केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी सुरू केली आहे.
मंगळवारी सकाळी शोध पथकाला स्वप्ना भांगरे हिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी मुलीचे वडील पोपट चिंधू भांगरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी रमेश बबन कडाळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नक्की कोणत्या कारणातून घडला, याचा सखोल तपास मंचर पोलीस करत आहेत.



