महाराष्ट्र

दुर्दैवी! रायगडमध्ये आईने चार मुलांना दिले विष; स्वतःही केली आत्महत्या, दोन निष्पाप जीवांचा अंत

 

रायगड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीवर घडलेल्या एका अत्यंत भीषण आणि दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका मातेने आपल्या चार लहान मुलांना थंडपेयातून विष पाजून स्वतःही विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी प्रकारात आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून, अन्य दोन मुले मृत्यूशी झुंज देत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आशा जाधव (वय २९) असे या मृत आईचे नाव आहे. कौटुंबिक किंवा अन्य कारणांमुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आशा यांनी आपल्या चार मुलांना विश्वासात घेऊन त्यांना कोल्ड्रिंक्समध्ये विषारी औषध मिसळून पाजले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.
या हृदयद्रावक घटनेत आई आशा जाधव यांच्यासह नंदिनी जाधव (वय ७) आणि दुर्गा जाधव (वय ६) या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने धाव घेतली. आशा यांच्या अन्य दोन मुलांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
या घटनेमुळे खरवली गावात शोककळा पसरली आहे. माणगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आत्महत्येमागचे नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. निष्पाप मुलांच्या अशा अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page