पुणे: ‘देवाचा अवतार’ सांगून महिलांचे शोषण करणाऱ्या ‘मिश्रा बाबा’ला अटक; वाघोलीतील भुयारी आश्रमावर पोलिसांचा छापा

पुणे, प्रतिनिधी : राज्यात खरात बाबा प्रकरणाच्या धक्क्यातून नागरिक सावरत नाही तोच, आता पुण्याजवळील वाघोली परिसरातील उबाळे नगर भागात स्वतःला ‘देवाचा अवतार’ असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे. मिश्रा बाबा असे या अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी बाबासह आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण खराडी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घडले असून, तिथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिश्रा बाबाने उबाळे नगर परिसरात जमिनीच्या खाली एक भुयारासारखी खोली तयार करून तिथे आश्रम उभारला होता. “माझ्या संपर्कात राहिल्यास धनलाभ होईल आणि जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील,” अशी भुरळ घालून तो महिलांना आश्रमात ओढत असे. धक्कादायक बाब म्हणजे, या आश्रमाच्या सुरक्षेसाठी त्याने चारी बाजूंनी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावले होते. एका पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर या क्रूर प्रकाराचा भांडाफोड झाला.
मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई
तक्रार प्राप्त होताच पुणे पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. मध्यरात्रीच्या सुमारास ४ आयपीएस अधिकाऱ्यांसह १०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने या हाय-प्रोफाईल मोहिमेत उबाळे नगर येथील या भुयारी आश्रमावर धाड टाकली. पोलीस पथकाने रात्रभर सर्च ऑपरेशन राबवून मिश्रा बाबा आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. या कारवाईदरम्यान आश्रमात आढळलेल्या ६ महिलांना देखील पोलिसांनी अटक केली असून, पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या बाबाच्या टोळीतील इतर सदस्यांचा आणि पीडित महिलांच्या नेमक्या संख्येचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे वाघोली आणि परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.



