लातूर

बोर्डाची चूक विद्यार्थ्यांच्या जिद्दीने सुधारली; ‘नापास’ झालेली २१ मुले ठरली ‘उत्तीर्ण’! लातूर विभागीय मंडळाचा धक्कादायक अहवाल: ८० टक्के उत्तरपत्रिकांमध्ये गुणांचा फेरबदल

लातूर, प्रतिनिधी : ‘गुण कमी मिळणार नाहीत, पण किमान काठावर पास होऊ,’ असा विश्वास असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा बोर्डाचा निकाल लागल्यानंतर भ्रमनिरास झाला होता. काहींच्या नशिबी तर अनपेक्षित ‘नापास’चा शिक्का पडला होता. मात्र, नैराश्याला बळी न पडता, जिद्दीने पुनर्मूल्यांकनाचा (रिचेकिंग) मार्ग निवडणाऱ्या २१ विद्यार्थ्यांसाठी हा निकाल ‘नवे आयुष्य’ देणारा ठरला आहे. लातूर विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या या प्रकारामुळे बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंत्रणेच्या ‘चुकी’चा २१ विद्यार्थ्यांना मोठा फटका

फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत लातूर विभागीय मंडळाचा निकाल अनुक्रमे ८८.४२ टक्के आणि ८४.१४ टक्के लागला होता. मात्र, निकालाने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा हिरमोड केला. आपल्या गुणांवर शंका असलेल्या १ हजार १५३ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यात धक्कादायक बाब समोर आली—पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जांपैकी ८० टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. यात प्रामुख्याने यंत्रणेच्या तांत्रिक चुकीमुळे ‘नापास’ म्हणून घोषित करण्यात आलेले १२ वीचे १३ आणि १० वीचे ८, असे एकूण २१ विद्यार्थी आता उत्तीर्ण झाले आहेत.

शिक्षक आणि पालकांचा संघर्ष यशस्वी

उत्तरपत्रिकांचे फोटोकॉपी मागवल्यानंतर, विद्यार्थ्यांनी ती आपल्या विषय शिक्षकांकडून सविस्तर तपासली. परीक्षकांनी काही ठिकाणी गुण देणे टाळल्याचे किंवा राहिले असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले. शिक्षकांनी या तांत्रिक चुकांचे पुरावे बोर्डाकडे सादर केले. त्यानंतर बोर्डाच्या तीन मॉडरेटर्सच्या विशेष समितीने पुनर्तपासणी केली आणि त्यानंतर या २१ विद्यार्थ्यांचे नशीब बदलले. यामुळे पुरवणी परीक्षेचा ताण असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आता ‘आनंदाश्रू’मध्ये रूपांतरित झाले आहेत.

बोर्डाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

एकाच वेळी ८० टक्के उत्तरपत्रिकांमधील गुणांत बदल होणे, ही बाब गंभीर आहे. जर विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनाचा अर्ज केला नसता, तर या २१ विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले असते. त्यामुळे, उत्तरपत्रिका तपासणाऱ्या परीक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ तर होत नाही ना, असा सवाल आता पालकांतून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page