रुग्णांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल; केंद्र सरकारकडून १६ ‘मिश्र औषधांच्या’ विक्री आणि उत्पादनावर बंदी

विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली:
सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि औषधांच्या अनिर्बंध वापराला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या १६ ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ (FDC) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारने तात्काळ बंदी घातली आहे. या औषधांच्या वापराला कोणतेही ‘वैद्यकीय समर्थन’ नाही आणि त्यांचे फायदे कमी व धोकेच जास्त आहेत, असे स्पष्ट करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.
‘एफडीसी’ (FDC) औषधं म्हणजे काय?
एफडीसी औषधांमध्ये दोन किंवा अधिक सक्रिय औषधी घटक (API) एका विशिष्ट प्रमाणात एकत्रित करून एकच गोळी किंवा सिरप तयार केले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने (DTAB) एका तज्ज्ञ समितीमार्फत या औषध संयोजनांची सखोल तपासणी केली. ही मिश्रणे अतार्किक, वैद्यकीय समर्थनाअभावी आणि मानवी शरीराला संभाव्य हानिकारक असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच या बंदीचा निर्णय घेण्यात आला. जनतेला केवळ प्रभावी व वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधेच उपलब्ध व्हावीत, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
प्रतिजैविके आणि स्कीन केअर उत्पादनांनाही फटका
अनेक प्रतिजैविक-आधारित मिश्रणांवरही (Antibiotic combinations) सरकारने कठोर बंदी घातली आहे. यामध्ये अमोक्सिसिलिन सोबत सेराटिओपेप्टिडेस, सेफाड्रॉक्सिल सोबत प्रोबेनेसिड, आणि सेफ्युरोक्झाइम सोबत सेराटिओपेप्टिडेस यांसारख्या मोठ्या प्रमाणावर लिहून दिल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. याशिवाय, त्वचारोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये कोरफड, व्हिटॅमिन ई, जोजोबा तेल, टी ट्री ऑइल आणि डी-पँथेनॉल यांसारखे घटक एकत्र असलेल्या अनेक स्कीन केअर क्रीम्स आणि लोशन्सवरही बंदी घालण्यात आली आहे.
कडक अंमलबजावणीचे आदेश
“औषधांच्या विवेकपूर्ण वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आणि रुग्णांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे,” असे मंत्रालयाने स्पष्ट केले. या अधिसूचनेचे देशात काटेकोर पालन व्हावे यासाठी सर्व राज्य औषध नियंत्रक, नियामक प्राधिकरणे आणि अंमलबजावणी संस्थांना कडक निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, संबंधित औषध उत्पादक, आयातदार आणि वितरकांना तातडीने सुधारणात्मक उपाययोजना करत बाजारातून हा साठा मागे घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



